दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या सुपर १२ फेरीत शुक्रवारी (५ नोव्हेंबर) भारत विरुद्ध स्कॉटलंड संघात सामना झाला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ८१ चेंडू राखून आणि ८ विकेट्सने विजय मिळवला. भारताचा हा या स्पर्धेतील दुसरा विजय ठरला असून आता भारतीय संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहिला आहे.
याशिवाय भारताने या सामन्यात मोठा विजय मिळवला असल्याने भारताचा रनरेट देखील सुधारला असून सुपर १२ फेरीतील गट दोनमधील उपांत्य फेरीच्या शर्यतीत असलेल्या न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानपेक्षा अधिक नेटरनरेट झाला आहे. या गटातून पाकिस्तानने आधीच उपांत्य फेरीचे तिकीट बूक केले आहे. त्यामुळे शर्यतीत न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि भारत आहे.
या सामन्यात स्कॉटलंडचा संघ १७.४ षटकांत ८५ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी ८६ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने ६.३ षटकांत २ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.
भारताकडून केएल राहुल आणि रोहित शर्माने ८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवात दमदार केली. या दोघांनीही सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना ४ षटकांतच अर्धशतकी भागीदारी केली. दरम्यान ५ व्या षटकांत रोहित शर्मा ब्रॅडली व्हीलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पण, केएल राहुलने अर्धशतक केले. मात्र, तो अर्धशतक करुन ५० धावांवर मार्क वॉटच्या गोलंदाजीवर मॅक्लिओडकडे झेल देत बाद झाला.
पण, अखेर बर्थडे बॉय विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विराट २ आणि सूर्यकुमार ६ धावांवर नाबाद राहिला.
भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्कॉटलंड संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र, स्कॉटलंडची सुरुवात खास राहिली नाही. त्याच्या कर्णधार काईल कोएत्झर जॉर्ज मुन्सेसह सलामीला फलंदाजीला उतरला होता. एका बाजूने मुन्से आक्रमक खेळत असताना दुसऱ्या बाजूला कोएत्झर ७ चेंडूत केवळ १ धाव करुन तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला.
दरम्यान, चौथ्या षटकात आर अश्विन विरुद्ध मुन्सेने सलग तीन चौकार मारले. पण त्याला सहाव्या षटकात मोहम्मद शमीने हार्दिक पंड्याच्या हातून झेलबाद केले. त्याने १९ चेंडूत २४ धावा केल्या. त्यानंतर ७ व्या षटकात रविंद्र जडेजाने स्कॉटलंडला दुहेरी धक्का दिला. त्याने या षटकात रिची बॅरिंग्टन आणि मॅथ्यू क्रॉस यांना बाद केले.
त्यांनंतर कॅलम मॅक्लिओड आणि मायकेल लीस्क यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण जडेजानेच १२ व्या षटकात लीस्कला २१ धावांवर माघारी धाडले. पाठोपाठ १४ व्या षटकात ख्रिस ग्रीव्हसला आर अश्विनने १ धावेवर बाद करत स्कॉटलंडला सहावा धक्का दिला. त्यामुळे १४ षटकात स्कॉटलंडची ६ बाद ६४ धावा अशी अवस्था झाली.
यानंतरही स्कॉटलंडचे फलंदाज फार काही करु शकले नाही. मार्क वॉटने झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण तोही १४ धावांवर बाद झाला. मोहम्मद शमीने गोलंदाजी केलेल्या १७ व्या षटकात सलग तीन चेंडूंवर स्कॉटलंडला तीन धक्के बसले. शमीने षटकाच्या पहिल्या चेंडूवर कॅलम मॅक्लिओडला त्रिफळाचीत केले, तर पुढच्या चेंडूवर सफियान शरिफ धावबाद झाला. त्याच्यापुढच्याच चेंडूवर शमीने अलासडेअर इव्हान्सला त्रिफळाचीत केले. १८ व्या षटकात जसप्रीत बुमराहने वॉटला त्रिफळाचीत केले. त्यामुळे स्कॉटलंडचा डाव १७.४ षटकांत ८५ धावांवर संपला.
भारताकडून मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने २ विकेट्स घेतल्या, तर आर अश्विनने १ विकेट घेतली.
असे आहेत संघ
विशेष म्हणजे शुक्रवारी भारताचा कर्णधार विराट कोहलीचा ३३ वा वाढदिवस आहे आणि त्याने यंदाच्या स्पर्धेत पहिल्यांदाच नाणेफेक जिंकली आहे. हा सामना भारतासाठी ‘करो वा मरो’ परिस्थितील सामना आहे.
या सामन्यासाठी भारताने शार्दुल ठाकूरच्या ऐवजी वरुण चक्रवर्तीला अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली आहे. तसेच स्कॉटलंडने या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही.
असे आहेत ११ जणांचे संघ –
स्कॉटलंड: जॉर्ज मुन्से, काइल कोएत्झर (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस (यष्टीरक्षक), रिची बेरिंग्टन, कॅलम मॅक्लिओड, मायकेल लीस्क, ख्रिस ग्रीव्हस, मार्क वॉट, सफियान शरीफ, अलासडेअर इव्हान्स, ब्रॅडली व्हील
भारत: केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या –
‘विक्रमवीर’ विराटचा वाढदिवस, बीसीसीआय शेअर केला खास व्हिडिओ
टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये कोण पोहोचणार आणि कोण जिंकणार? सेहवागने केली भविष्यवाणी
भारत का आहे सर्वात खतरनाक संघ? न्यूझीलंडच्या गोलंदाजाचा मोठा खुलासा