आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा प्रारंभ होण्यासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या स्पर्धेत बऱ्याचशा मातब्बर क्रिकेटपटूंवर क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा या खेळाडूंचाही समावेश आहे, ज्यांना टी२० विश्वचषकातील खतरनाक खेळाडूंपैकी एक समजले जात आहे. परंतु पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याचे म्हणणे जरा वेगळेच आहे. आयसीसीद्वारे आयोजित एका पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
आझमच्या मते टी२० विश्वचषकात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हा सर्वात घातक फलंदाज सिद्ध होईल. तर गोलंदाजांमध्ये पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज हसन अली विरोधकांची भंबेरी उडवेल.
याविषयी आझम म्हणाला की, “मला वाटते फलंदाजांमध्ये केन विलियम्सन आणि गोलंदाजांमध्ये हसन अली, या टी२० विश्वचषक स्पर्धेतील सर्वात यशस्वी क्रिकेटपटू ठरतील.” थोडक्यात भारताचा एकही क्रिकेटपटू पाकिस्तान संघासाठी धोक्याची घंटा असेल, असे आझमला वाटत नाही.
याच धर्तीवर टी२० विश्वचषकाची सुरुवात होण्यापूर्वीच आझमने भारताविरुद्ध डावपेच रचायला सुरुवात केली आहे. नुकतेच त्याने भलेही टी२० विश्वचषकात पाकिस्तानला भारताच्या हातून ५ वेळा पराभवाचा सामना लागला असला; तरीही यावेळी पाकिस्तानचे पारडे जड असल्याचे त्याने म्हटले होते.
“आमचे मनोबल उंचावलेले आहे आणि आम्ही भारताविरुद्धचा पहिला सामना जिंकत स्पर्धेची सकारात्मक सुरुवात करू इच्छित आहोत. कोणत्याही स्पर्धेत सुरुवातीला लयीत येण्यासाठी संघाचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे असते. मी टी२० विश्वचषकादरम्यान रिझवानसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी जाईल. पण परिस्थितीनुसार आमच्या या योजनेत बदलही होऊ शकतो. यासाठी मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक या अनुभवी खेळाडूंची आम्हाला मदत होईल,” असे त्याने म्हटले होते.
तसेच पुढे बोलताना तो म्हणाला होता की, “आम्हाला माहिती आहे की, युएईतील खेळपट्टी कशा असतील आणि फलंदाजांना तेथे कसे सामंजस्य बसवावे लागले. सामन्यादिवशी जो संघ चांगला खेळेल तोच संघ जिंकेल. मला तर वाटते की, आम्हीच हा सामना जिंकू. आम्हाला दबावाची जाणीव आहे. त्यामुळे अपेक्षा आहे की, आम्ही हा सामना जिंकत लयीत येऊ. भूतकाळात झालेल्या गोष्टींचा आम्ही जास्त विचार करत नाही. आम्ही फक्त भविष्याविषयी विचार करतो आणि सद्या त्याचीच तयारी करतो आहोत. संघातील सर्व खेळाडूंनी मायदेशातील क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. आम्हाला आशा आहे की, वरिष्ठ खेळाडूंकडून आम्हाला या स्पर्धेत काहीतरी शिकायला मिळेल.”
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील टी२० विश्वचषकाची पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सुट्टी नाय..! ‘भारताविरुद्ध पराभव झाल्यास घरी येऊ देणार नाही…’, पाकिस्तानच्या कर्णधाराला धमकी
शास्त्रींपेक्षा जास्त पगार ते भारतीय संघाहून अधिक जबाबदारी, द्रविडसाठी बीसीसीआयची मोठी योजना