आयसीसी टी-२० विश्वचषकात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) भारत आणि स्कॉटलंड संघ आमने- सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने स्कॉटलंडवर मोठा विजय मिळवला. स्कॉटलंड संघ प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या करू शकला नाही. प्रत्युत्तरात भारतीय संघाने सहज विजय मिळवला. सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाज दोघांनी अप्रतिम प्रदर्शन केले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ३.४ षटकात १० धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. त्याने या प्रदर्शानाच्या जोरावर दोन नवीन विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत.
बुमराहने या सामन्यात टाकलेल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये एक षटक निर्धाव फेकले. या प्रदर्शनाच्या जोरावर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधीन दोन नवीन विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत. तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणार गोलंदाज ठरला आहे. तसेच या सामन्यात टाकलेल्या एका निर्धाव षटकाच्या जोरावर तो आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकणारा गोलंदाजही बनला आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स
बुमराहने या सामन्यात घेतलेल्या दोन विकेट्सच्या मदतीने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-२० मधील ६४ विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यानंतर तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर युझवेंद्र चहल आहे, ज्याने ६३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ५५ विकेट्स घेऊन रविचंद्रन अश्विन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भुवनेश्वर कुमार ५० आणि सवींद्र जडेजा ४३ विकेट्ससह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
सर्वाधिक निर्धाव षटके टाकणारा गोलंदाज
स्कॉटलंडविरुद्ध एक निर्धाव षटक टाकून जसप्रीत बुमराहने अजून एक विक्रम त्याच्या नावावर केला आहे. तो आता आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकणार गोलंदाज बनला आहे. त्याने श्रीलंकेच्या नुवान कुलसेकराला मागे टाकेले आहे. कुलसेकराने ५८ सामन्यात ६ निर्धाव षटके टाकली आहेत. त्यानंतर आता बुमराह ५४ सामन्यात ८ निर्धाव षटके टाकून पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
दरम्यान, भारत आणि स्कॉटलंड यांच्यातील सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्कॉटलंड संघ प्रथम फलंदाजी करताना १७.४ षटकात ८५ धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरादाखल भारतीय सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात दिली. सलामीवीरांनी केलेल्या खेळीच्या जोरावर भारताने अवघ्या ६.३ षटकात आणि दोन विकेट्सच्या नुकसानावर सामन्यात विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुजीबसाठी भारतीयांनी देव ठेवले पाण्यात; ट्विटरवर होतोय ट्रेंड
-भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणतोय, “विराट बुर्ज खलिफा, तर धोनी बुर्ज अल अरब”
-‘बुमराह असावा भारताचा पुढील कर्णधार’; ‘हे’ कारण देत दिग्गजाने वाढवली यादी