टी२० विश्वचषकात सोमवारी (१ नोव्हेंबर) इंग्लंड आणि श्रीलंका यांच्या ग्रुप एक मधील सामना खेळला गेला. हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर आयोजित केला गेला होता. सामन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. इंग्लंड संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि त्यांनी मर्यादित २० षटकांमध्ये चार विकेट्च्या नुकसानावर १६३ धावा केल्या. यामध्ये त्यांचा सलामीवीर जॉस बटलर आणि कर्णधार ओएन मॉर्गन या दोघांनी केलेल्या खेळीची महत्वाची भूमिका होती. जॉस बटलरने या सामन्यात त्याचे शतक पूर्ण केले.
बटलरचे शतक हे टी-२० विश्वचषकातील नववे शतक आहे. तसेच जॉस बटलर हा टी२० विश्वचषकात शतक करणारा आठवा खेळाडू ठरला आहे. बटलरने श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात ६७ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. यामध्ये त्याच्या सहा चौकार आणि सहा षटकारांचा समावेश आहे. बटरलने या धावा १५०.७५ च्या स्ट्राइक रेटने केल्या आहेत.
बटलरच्या आधी टी-२० विश्वचषकात शतक करणाऱ्यांचा विचार केला, तर यामध्ये वेस्ट इंडीजचा धमाकेदार फलंदाज ख्रिस गेलचा समावेश आहे. गेलने त्याच्या टी-२० विश्वचषकाच्या कारकिर्दीत दोन वेळा शतकी खेळी केली आहे. त्यानंतर भारताचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैना, श्रीलंकेचा महेला जयवर्धने, न्यूझीलंडचा ब्रँडम मक्युलम, इंग्लंडचा एलेक्स हेल्स, पाकिस्तानचा अहमद शेहजाद, बांगलादेशचा तमिम इक्बाल, त्यानंतर आता इंग्लंडच्या जॉस बटलरचा या यादीत नव्याने समावेश झाला आहे.
दरम्यान, सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकली आणि इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. श्रीलंका संघाने प्रथम गोलंदाजी करत इंग्लंडला १६३ धावांवर रोखले. यामध्ये जॉस बटलरच्या शतकी खेळीव्यतिरिक्त कर्णधार ओएन मॉर्गनने ३६ चेंडूत ४० धावा केल्या. श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने त्याच्या चार षटकांमध्ये २१ धावा दिल्या आणि सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
यानंतर १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला १९ षटकांत सर्वबाद १३७ धावाच करता आल्या. त्यामुळे इंग्लंडने हा सामना २६ धावांनी जिंकला. श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगाने सर्वाधिक ३४ धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली, ख्रिस जॉर्डन, आदील राशिद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
“भारतीय संघाप्रती थोडी मवाळ भूमिका घ्या आणि थोडी सहानुभूती ठेवा”
कठीण काळात पीटरसन उभा राहिला टीम इंडियाच्या पाठीशी; हिंदीत ट्विट करत म्हणाला…
‘सुपरमॅन’ नीशम! बाऊंड्री लाईनजवळ हवेत उडी मारत अडवला हार्दिक पंड्याचा षटकार, पाहा व्हिडिओ