टी२० विश्वचषकाची सुरुवात भारतीय संघाला विजयाने करता आली नाही. पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात रविवारी (३१ ऑक्टोबर) न्यूझीलंड संघाशी भिडणार आहे.
पाकिस्तानने विश्वचषकातील त्यांचे पहिले तीन सामने जिंकले असून उपांत्य सामन्यातील स्थान जवळपास निश्चित केले आहे. अशात भारताला जर उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचायचे असेल, तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकावा लागणार आहे. आपण या लेखात तीन महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत, ज्याच्या जोरावर भारतीय संघ न्यूझीलंडला पराभूत करू शकतो.
हार्दिक पंड्याच्या जागी इशान किशन : हार्दिक पंड्या भारतीय संघाचा एक महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र, मागच्या काही काळापासून तो दुखापतीच्या कारणास्तव गोलंदाजी करू शकलेला नाही. हार्दिकने मागच्या जवळपास एक वर्षापासून मैदानावर सामना खेळताना फारशी गोलंदाजी केलेली नाही. तसेच तो फलंदाजीमध्येही काही खास कमाल करू शकलेला नाही. अशात त्याच्या जागी एका चांगल्या फॉर्ममधील फलंदाजाला संघात सामील केले जाऊ शकते. इशान किशन हार्दिकच्या बदल्यात संघात सामील करण्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो.
भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकुर : पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा एकही गोलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. मात्र, यामध्ये सर्वात जास्त भुवनेश्वर कुमारने आणि मोहम्मद शमीने चाहत्यांना निराश केले होते. असे असले तरी, मोहम्मद शमीची मागील काही सामन्यांमधील कामगिरी भुवनेश्वरपेक्षा उजवी आहे. त्यामुळे भुवनेश्वरच्या ऐवजी शार्दुल ठाकुरला संधी दिली पाहिजे. शार्दुलला संघात सामील केल्यानंतर संघाला फलंदाजीमध्येही एक पर्याय मिळणार आहे. तो फलंदाजीमध्येही सध्या चांगले प्रदर्शन करत आहे.
वरुण चक्रवर्तीच्या जागी रविचंद्रन अश्विन : संघात अनुभवी फरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विन उपलब्ध असूनही त्याला पाकिस्तनाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संधी दिली गेली नाही. संघात अश्विनच्या जागी मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला संधी दिली गेली होती. मात्र, वरुण चक्रवर्तीला संधी देऊनही त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अश्विनला संधी दिली गेली नसल्यामुळे चाहत्यांनीही चांगलेच प्रश्न उपस्थित केले होते. अशात आता न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अश्विनला संधी दिली गेली, तर संघाला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. अश्विन गोलंदाजीव्यतिरिक्त थोडी फार फलंदाजीही करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषक: गोलंदाजांनी रोखलं, फलंदाजांनी चोपलं! इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्सने एकतर्फी विजय






