पाकिस्तान क्रिकेट संघाने 1992मध्ये इंग्लंडला मेलबर्न क्रिकेट मैदानावर पराभूत करत पहिल्यांदा वनडे विश्वचषक आपल्या नावावर केला होता. यानंतर तब्बल 30 वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी पाकिस्तान संघाकडे चालून आली होती. मात्र, या संधीचं सोनं करण्यात पाकिस्तानची दाणादाण उडाली. त्यामुळे ही संधी इंग्लंडच्या पारड्यात पडली. इंग्लंडने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) 5 विकेट्सने पराभूत केले. इम्रान खान यांच्याप्रमाणे बाबर आझम इंग्लंड नमवण्यात अपयशी ठरला.
या सामन्यात पाकिस्तान संघाने निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 137 धावांचा छोटासा डोंगर उभा केला होता. पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. पाकिस्तानच्या डावात इंग्लंडचा गोलंदाज सॅम करन याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटकात 12 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानचे 138 धावांचे आव्हान इंग्लंडने बेन स्टोक्स याच्या नाबाद 52 धावांच्या खेळीने पूर्ण केले. इंग्लंडने वेस्ट इंडिजच्या सर्वाधिक 2 टी20 विश्वचषक जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. यापूर्वी इंग्लंडने पॉल कॉलिंगवूड याच्या नेतृत्वाखाली 2010मध्ये टी20 विश्वचषक जिंकला होता.
बाबर आझम याच्या या 5 कमतरतांमुळे इम्रान खान यांच्या विक्रमापर्यंत पोहोचू शकला नाही.
1. इम्रान खान 1992मध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरले होते. त्यांनी संघाकडून सर्वाधिक 72 धावाही चोपल्या होत्या. त्यांनी गोलंदाजी करताना एक विकेटही घेतली होती. दुसरीकडे, बाबर आझम या सामन्यात 32 धावाच करू शकला. तसेच, संघाकडून कुणालाही अर्धशतक झळकावता आले नाही.
2. मोहम्मद रिझवान संघाचा दुसरा सर्वात विश्वासू फलंदाज मानला जातो. मात्र, अंतिम सामन्यात तो 14 चेंडूत 15 धावा करून तंबूत परतला. तसेच, 1992च्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर जावेद मियांदाद यांनी 58 धावा करत संघाची धावसंख्या 200 पर्यंत पोहोचवली होती.
3. अष्टपैलू मोहम्मद नवाज अंतिम सामन्यात काहीच कमाल दाखवू शकला नाही. त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. फलंदाजी करताना तो 7 चेंडूत फक्त 5 धावा करू शकला. 1992मध्ये वसीम अक्रम यांनी 18 चेंडूत 33 धावा केल्या होत्या. यामुळे संघ 249 धावांपर्यंत पोहोचू शकला होता.
4. टी20 विश्वचषकात महत्त्वाच्या क्षणी शाहीन शाह आफ्रिदी दुखापतग्रस्त झाला. तो ज्यावेळी संघातून बाहेर पडला, त्यावेळी इंग्लंडने 29 चेंडूत 41 धावा चोपल्या होत्या. दुसरीकडे, 1992मध्ये अंतिम सामन्यात वसीम अक्रम आणि मुश्ताक अहमद यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेत इंग्लंडला 227 धावांवर रोखले होते.
5. अंतिम सामन्यात पाकिस्तानचे फिरकीपटू एकच विकेट घेऊ शकले. इफ्तिखार अहमद याने 5 चेंडूत 13 धावा दिल्या. दुसरीकडे, मुश्ताक अहमद यांच्याव्यतिरिक्त आमिर सोहेल यांनीही दमदार गोलंदाजी केली होती. (T20 World Cup 2022 Final england won by 5 wickets against babar azam’s pakistan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चॅम्पियन बनताच इंग्लंडवर पडला पैशांचा पाऊस, भारताच्या वाट्याला आले इतके कोटी?
टी20 वर्ल्डकप: 2007 ते 2022, ‘हे’ आहेत फायनलमध्ये ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरलेले खेळाडू, यादी पाहाच