ऑस्ट्रेलियात खेळला जाणारा पुरूष टी20 विश्वचषक (T20 World Cup)16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यामध्ये पहिला सामना श्रीलंका विरुद्ध नामिबिया यांच्यात खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्न येथे रंंगणार आहे. त्याआधी भारतीय संघ चार सराव सामने खेळणार आहेत. त्यातील तीन सामने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि एक सामना न्यूझीलंड विरुद्ध असणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, भारत 6 ऑक्टोबरलाच ऑस्ट्रेलियासाठी रवाणा होणार आहे. यामुळे भारताकडे अधिक वेळ असल्याने ते अधिक सराव सामने खेळतील अशा चर्चा होत आहे. याआधी आयसीसीने प्रत्येक संघाच्या सराव सामन्यांची घोषणा केली होती. त्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक आणि बोर्ड यांनी भारताला अधिक सराव सामने खेळू द्यावे अशी मागणी केली होती. ती आता पूर्ण होताना दिसत आहे, कारण भारत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड बरोबरच आणखी एका संघासोबत सराव म्हणून काही अभ्यास सामने खेळणार आहेत.
भारत वेस्टर्न ऑस्ट्रेलिया एकादश यांच्यासोबत दोन सामने खेळणार आहे. यातील पहिला सामना आणि दुसरा सामना अनुक्रमे 10 आणि 12 ऑक्टोबरला पर्थ येथे खेळले जाणार आहेत. त्यानंतर गतविजेता ऑस्ट्रेलिया विरुद्ध 17 ऑक्टोबरला आणि न्यूझीलंड विरुद्ध 19 ऑक्टोबरला सराव सामने खेळणार आहेत. हे सामने ब्रिसबेन येथे खेळले जाणार आहेत.
या विश्वचषकासाठी जाहीर केलेला भारताच्या संघातील काही जण पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणार आहेत. अशातच मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर झाल्याने संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. यामुळे खेळाडूंना ऑस्ट्रेलियातील चेंडू उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यावर चांगला सराव व्हावा त्यासाठी अधिक सराव सामने घेण्याचा हेतू आहे.
या स्पर्धेत सुपर12मध्ये असलेला भारत पाकिस्ताननंतर 27 ऑक्टोबरला ए2चा (श्रीलंका, नामिबिया, युएई, नेदरलॅंड्स) यांच्यापैकी विजेता संघ, 30 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिका, 2 नोव्हेंबरला बांगलादेश आणि 6 नोव्हेंबरला बी 1चा (वेस्ट इंडिज, स्कॉटलंड, झिम्बाब्वे, आर्यलंड) यांच्यापैकी विजेता संघ असे सामने खेळणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मिलरच्या कॅचनंतर चाहरने सिराजला केली शिवीगाळ! कॅप्टन रोहितच्या रागाचाही चढला पारा
‘बर्थडे बॉय’ वॉशिंग्टन सुंदरच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर घडलीये अफलातून घटना; वाचा आजवरचा प्रवास