मंगळवारी (4 जून) रात्री टी20 विश्वचषक 2024 चे दोन सामने खेळले गेले. यातील एक सामना पूर्ण खेळला गेला, तर एक सामना पावसामुळे वाहून गेला.
नेदरलँड्सनं नेपाळचा पराभव करून स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला, तर इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड सामना पावसामुळे वाहून गेला. यामुळे इंग्लंड संघाचं नुकसान झालं आहे. कारण संघाला दोन गुण मिळू शकले असते. नेदरलँड्सनं नेपाळवर 6 गडी राखून विजय मिळवला. यासह संघ ‘ड’ गटात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात पावसानं चांगलाच खोळंबा घातला. नाणेफेक वेळेवरच झाली, मात्र त्यानंतर पावसानं खेळ खराब करण्यास सुरुवात केली. स्कॉटलंड संघ कसा तरी 10 षटकं खेळला, परंतु सामना पुढे होऊ शकला नाही. पावसानं व्यत्यय आणल्यानंतर सुमारे 5 तास प्रतीक्षा केल्यानंतरही सामना पूर्ण होऊ शकला नाही. यानंतर सामना रद्द करण्यात आला. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, इंग्लंडला 10 षटकात एकही विकेट मिळाली नव्हती, तर स्कॉटलँडनं 90 धावा केल्या होत्या.
नेदरलँड्स विरुद्ध नेपाळ सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात जास्त धावा बनल्या नाहीत. नेपाळनं प्रथम फलंदाजी करताना 19.2 षटकात फक्त 106 धावा केल्या. संघाच्या 4 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. कर्णधार रोहित पुडेलनं 35 धावांची खेळी केली, तर नेदरलँड्सकडून टिम प्रिंगल आणि लोगन व्हॅन बीक यांनी 3-3 बळी घेतले. नेदरलँडकडून फलंदाजीत अनुभवी मॅक्स ओ’डॉडची चमक पाहायला मिळाली. त्यानं 45 चेंडूत 54 धावा केल्या. नेदरलँडनं 19 व्या षटकात शानदार विजय नोंदवला.
महत्त्वाच्या बातम्या –
या 5 दिग्गज खेळाडूंचा असू शकतो हा अखेरचा टी20 विश्वचषक, संघात पुन्हा संधी मिळणार नाही
लोकसभा निवडणूक निकालातही आरसीबी फॅन्सची हवा! सोशल मीडियावर कमेंट्स व्हायरल
अफगाणिस्तानची टी20 विश्वचषकाला धडाकेबाज सुरुवात! पहिल्याच सामन्यात मिळवला शानदार विजय