आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका येथे खेळण्यात येणार आहे. बांग्लादेशने या स्पर्धेतून माघार घेतली असून त्यांनी आता स्वत:चाच एक टी२० चषक सुरू केला आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डने (बीसीबी) नवी स्थानिक स्पर्धा सुरू केली आहे. ओडोम्मो (ODOMMO) बांग्लादेश टी२० चषक असे त्याला नाव दिले आहे.
ही स्पर्धा ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान खेळली जाणार आहे. यामध्ये तीन संघ असणार आहेत. धुमकेतू इलेवन, दरबार इलेवन आणि दुरांतो इलेवन अशी संघांची नावे आहेत. या स्पर्धेमार्फत देशातील मर्यादीत षटकांचे सामने उत्तम खेळणाऱ्यांना एका ठिकाणी आणण्याचा हेतू आहे. बांग्लादेशच्या टी२० संघाचा कर्णधार लिटन दास धुमकेतू इलेवनचे नेतृत्व करणार आहे. दरबार इलेवनचा कर्णधार नजमुल शांतो आणि दुरांतो इलेवनचा कर्णधार अकबर अली असणार आहेत.
बीसीबीने ही काही औपचारिकतेची स्पर्धा नसून पूर्णपणे प्रतिस्पर्धेसारखी असणार आहेत. या स्पर्धेत विजेत्या संघाला १ कोटी ८७ लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच खेळाडूंनाही रोख रक्कम दिली जाणार आहे. “आम्ही खेळाडूंना रोख रकमेची बक्षिसे देणार आहोत. ही स्पर्धा सोपी नसणार ती बाकीच्या स्पर्धांसारखीच असेल. यामध्ये आम्ही तीन संघ निश्चित केले असून विजेत्या संघाला मोठी रक्कम दिली जाणार”, असे बीसीबीच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
या स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेयर नियमही वापरला जाणार आहे. यातील गटातील सामने ५, ६ आणि ७ फेब्रुवारीला खेळले जाणार असून अंतिम सामना ९ फेब्रुवारीला होणार आहे. संध्याकाळी ६ वाजता सामन्यांना सुरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी बीसीबीने एक फेब्रुवारीला शेर ए बांग्ला या नॅशनल स्टेडियमवर फिटनेस शिबीरही आयोजित केले होते.
बांग्लादेशचे टी२० विश्वचषकातील गटाचे सामने भारतात खेळले जाणार होते. मात्र दोन्ही देशांमधील राजकिय संबंधामुळे बांग्लादेशला भारतात खेळण्यास असुरक्षित वाटले आणि त्यांनी या स्पर्धेतून माघार घेतली. त्यांच्या जागी स्कॉटलंड खेळणार असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने जाहीर केले.






