आगामी टी२० विश्वचषक २०२६मध्ये इंडिया ए संघ दोन वॉर्म अप सामने खेळणार आहेत. हे सामने युएसए आणि नामिबिया विरुद्ध आहेत. यामध्ये इंडिया ए संघाचे नेतृत्व आयुष बदोनी करणार असून तिलक वर्माचाही संघात समावेश करण्यात आला आहे. तो दुखापतीमुळे मुख्य संघातून काही काळ बाहेर होता. तसेच तो नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेलाही मुकला होता.
तिलक भारताच्या टी२० विश्वचषक संघाचा भाग असून त्याचा अधिक सराव व्हावा यासाठी त्याला या दोन्ही सामन्यांत संधी दिली आहे. दुखापतीमुळे त्याने न्यूझीलंडविरुद्ध एकही टी२० सामना खेळला नाही. त्याच्याजागी संघात श्रेयस अय्यरला घेतले होते, तर ईशान किशनने काही सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती
तिलक आता पूर्णपणे फिट आहे. तो सराव सामन्यांसाठी संघाशी जोडला जाणार आहे.
मंयक यादवही खूप काळानंतर मैदानात दिसणार आहे. तसेच रियान परागही खेळणार आहे. तो मुख्य संघात वॉशिंग्टन सुंदरची जागा घेण्याची शक्यता असल्याने त्यालाही संधी दिली आहे. काही रिपोर्ट्सनुसार सुंदर लवकरच फिट होऊ शकतो, तरीही पर्यायी खेळाडू म्हणून परागला तयार ठेवले आहे.
रवि बिश्नोई पण या संघात असून नुकतेच त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेतील एक सामना खेळत चांगली कामगिरी केली होती.
यातील पहिला वॉर्म-अप सामना आज (२ फेेब्रुवारी) युएसशी होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता सुरू होणार आहे. हा सामना मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तसेच दुसरा सामना ६ फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध असून तो बेंंगलुरूमध्ये खेळला जाणार आहे.
त्यानंतर भारताचा सराव सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. हा सामना ४ फेब्रुवारीला मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
टी२० विश्वचषक २०२६च्या वॉर्म-अप सामन्यासाठी इंडिया ए संघ-
आयुष बदोनी (कर्णधार), प्रियांश आर्या, नारायण जगदीसन (विकेटकीपर), नमन धीर, रियान पराग, आशुतोष शर्मा, उर्विल पटेल (विकेटकीपर), विप्रज निगम, मानव सुथार (उपकर्णधार) रवी बिश्नोई, खलील अहमद, मयंक यादव, अशोक शर्मा, तिलक वर्मा, गुर्जपनीत.






