टी-20 विश्वचषक 2026 (T20 international world cup 2026) मध्ये भारत आणि अमेरिका (USA) आमनेसामने येणार आहेत. भारताचा हा या स्पर्धेतील पहिलाच सामना असेल. टीम इंडियाची तयारी पूर्ण झाली असून काही खेळाडूंच्या दुखापतींची चिंता असली, तरी सुरुवातीच्या सामन्यात त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. पहिल्या सामन्यात भारताची रणनीती आणि सलामी जोडी कशी असणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
पहिल्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताने 5 पैकी 4 सामने जिंकले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यातही भारताने विजय मिळवला. सध्याचा फॉर्म पाहता टीम इंडिया अत्यंत आक्रमक खेळ करणार हे स्पष्ट आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या गोलंदाजांची कठीण परीक्षा असेल.
BCCI ने निवडलेल्या संघातून दोन खेळाडू पहिला सामना खेळण्याची शक्यता कमी आहे. वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. तसेच हर्षित राणाच्या (Harshit Rana) फिटनेसबाबतही शंका असून त्याच्या जागी मोहम्मद सिराजची (Mohmmed Siraj) एन्ट्री होऊ शकते. पण सिराज थेट येऊन पहिला सामना खेळणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
शनिवारी जेव्हा टीम इंडिया मैदानात उतरेल, तेव्हा अभिषेक शर्मासोबत ईशान किशन डावाची सुरुवात करण्याची दाट शक्यता आहे. सराव सामन्यात या जोडीने जबरदस्त फलंदाजी केली होती. त्यामुळे संजू सॅमसनला कदाचित संधी मिळणार नाही. तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर, तर कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर दिसेल. त्यानंतर हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल खेळतील, तर रिंकू सिंह फिनिशरची भूमिका बजावेल.
गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांचे स्थान पक्के मानले जात आहे. त्यांना अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्याची साथ मिळेल. गरज पडल्यास शिवम दुबेदेखील काही षटके टाकू शकतो.
अमेरिकेविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती.






