भारताने आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६च्या सुपर-८ मध्ये एक विजय मिळवला आहे. चेन्नईमध्ये (२६ फेब्रुवारी) झालेल्या त्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला ७२ धावांनी पराभूत केले आणि उपांत्य फेरीत एक पाऊल ठेवले. या सामन्यात भारताच्या काही खेळाडूंच्या कामगिरीबाबात दिग्गजांनी निराशा व्यक्त केली आहे. त्यामध्ये शिवम दुबेचे नाव समोर येत आहे. तसेच वेस्ट इंडिजविरुद्ध काय केले पाहिजे, हे पण सुचविले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सुपर-८चा सामना गमावल्याने गतविजेत्या भारताला झिम्बाब्वेविरुद्ध मोठा विजय आवश्यक होता आणि तो मिळालाही, मात्र त्यामध्ये दुबेची कामगिरी वाईट झाली. त्याच्या या कामगिरीचे भारताला कदाचित नुकसान नाही झाले, हे उत्तम झाले. त्याने या सामन्यात २ षटके टाकताना ४६ धावा दिल्या होत्या, त्याच्या याच कामगिरीमुळे भारताचे माजी क्रिकेटपटू के श्रीकांत यांनी नाराजी दर्शवली आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध दुबेच्या गोलंदाजीची लाईन आणि लेंथ एवढी खराब होती की त्याने त्या २ षटकात ४ वाईड आणि २ नो-बॉल टाकले. “असे वाटत आहे तो सहाव्या स्टम्पवर चेंडू टाकत होता”, असे माजी मुख्य राष्ट्रीय संघनिवड अधिकारी श्रीकांत यांनी म्हटले आहे.
चेन्नईमध्ये झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात फलंदाजांसाठी योग्य असलेल्या खेळपट्टीवर दुबेने कशी गोलंदाजी केली? याबाबत श्रीकांत यांनी वक्तव्य केले आहे. “मला गोलंदाजीबाबात काही चिंता नाही. ती खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती. मला केवळ सहाव्या गोलंदाजाबद्दल चिंता आहे. त्यामध्ये शिवम दुबे कशी गोलंदाजी करतोय, हे पाहून आश्चर्य वाटते. तो सहाव्या स्टम्पवर चेंडू टाकत असल्याचे दिसत होते. मी अशी गोलंदाजी कधीच पाहिली नाही,” असे त्यांनी त्यांच्या चिकी चीका शो-मध्ये म्हटले आहे.
श्रीकांत यांना भारतीय संघावर पूर्ण विश्वास असून वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात सहाव्या गोलंदाजाचा वापर करावा की नाही याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले, “मी आधीच म्हटले होते की भारत दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईमध्ये जिंकणार आणि विजेतेपद जिंकण्याच्या जवळ पोहोचणार. अर्शदीप आणि बुमराह चांगली गोलंदाजी करत आहे, वरुण आणि हार्दिकची कामगिरीही उत्तम आहे, मात्र तुम्हाला वेस्ट इंडिजविरुद्ध सहाव्या गोलंदाजीचा वापर करण्याची आवश्यकता नाही.”
या स्पर्धेत भारताचा पुढील आणि शेवटचा सुपर-८ सामना वेस्ट इंडिजविरुद्ध एक मार्चला होणार आहे. हा सामना कोलकातामध्ये खेळला जाणार आहे.






