टी२० विश्वचषक गतविजेता भारत घरच्या मैदानावर पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्याच्या तयारीत व्यस्त आहे. यासाठी सध्या भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेत खेळणारे अनेक खेळाडू भारताच्या टी२० विश्वचषकाच्या संघात आहेत. त्यामुळे या स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात आहे. याआधीच भारताचे अनेक महत्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त देखील झाले होते. त्यातील तिलक वर्मा आणि अक्षर पटेल फिट झाले असून अष्ट्पैलू वॉशिंग्टन सुंदरबाबत मात्र शंका आहे. त्यासाठी दुसरा खेळाडू तयार करण्याच्या प्रयत्नात संघ आहे.
फिरकीपटू सुंदरची दुखापत गंभीर असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एका खेळाडूला तयार राहण्यास सांगितले आहे. काही रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने बेंगलारच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसला (सीओई) रियान पराग याला तयार करण्यास सांगितले आहे.
सुंदर टी२० विश्वचषकाच्या सुरूवातीच्या काही सामन्यांत खेळू शकणार नाही. तसे झाले तर परागला संधी मिळू शकते. या विश्वचषकाआधी भारत ४ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.
पराग ताबडतोब फलंदाजीबरोबर स्पिन गोलंदाजीही उत्तम करतो. तो सीओईमध्ये त्याच्या दुखापतीतूनच सावरत होता. जी त्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये झाली होती. त्यानंतर तो विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी २०२५-२६चा दुसरा टप्पा यालाही मुकला होता. तो मैदानावर शेवटचा सामना ६ डिसेंबर २०२५मध्ये खेळला आहे. तसेच तो २०२४मध्ये भारताच्या श्रीलंका दौऱ्याचा भाग राहिला होता.
पराग लवकरच दुखापतीतून सावरत असून त्याने नेटमध्ये सरावही सुरू केला आहे. तसेच त्याने यो-यो टेस्टही पास केली आहे. ३१ जानेवारीनंतरच त्याच्या फिटनेस चाचणीबाबत अंतिम अहवाल येईल. तो भारताच्या मुख्य टी२० विश्वचषकाच्या संघात नाही. बोर्ड त्याला राखीव खेळाडू म्हणून वेळेवर संघात घेऊ शकतो.
सुंदरला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत साईड स्ट्रेनची दुखापत झाली होती. यामुळे तो नंतरच्या टी२० मालिकेलाही मुकला.





