2026 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये आपले सामने भारताबाहेर खेळवले जावेत, अशी बांगलादेशची इच्छा आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत आपल्या संघाला भारतात पाठवण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानचे सामने आधीच श्रीलंकेत होणार आहेत, अशात जर बांगलादेशचे सामनेही यजमान देश म्हणजेच भारतात झाले नाहीत, तर बीसीसीआयला (BCCI) काही नुकसान होईल का?
सर्वात आधी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, टी20 वर्ल्ड कप 2026 ही एक आयसीसी (ICC) इव्हेंट आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे आयोजित या स्पर्धेत तिकीट विक्री, प्रायोजकत्व आणि प्रसारणातून होणारी कमाई थेट बीसीसीआयकडे जात नाही, मग ते यजमान देश का असेना. या स्पर्धेतून होणाऱ्या कमाईचा संपूर्ण हिशोब ‘आयसीसी बिझनेस कॉर्पोरेशन’ ठेवते. यजमान बोर्ड म्हणून बीसीसीआयची भूमिका केवळ स्पर्धेचे आयोजन आणि संचालनापुरती मर्यादित असेल.
टी20 वर्ल्ड कप 2026 च्या माध्यमातून बीसीसीआयची कमाई प्रामुख्याने ‘मॅच डे सरप्लस’ आणि स्थानिक प्रायोजकत्वावर अवलंबून असते. या कारणामुळे, जर बांगलादेशचे सामने भारताबाहेर हलवले गेले, तर बीसीसीआयच्या कमाईवर फारसा परिणाम होणार नाही. बीसीसीआयला जर काही नुकसान सोसावे लागलेच, तर ते केवळ त्या सामन्याच्या दिवसापुरत्या अर्थशास्त्रापर्यंत मर्यादित असेल.
वर्ल्ड कपचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले आहे. खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि इतर अधिकाऱ्यांचे राहणे व विमानाचे बुकिंग आधीच पूर्ण झालेले असते. सध्याच्या वेळापत्रकानुसार, बांगलादेशचे सामने कोलकाता आणि मुंबईत होणार आहेत. आता जर हे सामने बदलले, तर उपलब्ध माहितीनुसार खेळाडू आणि कर्मचाऱ्यांच्या हॉटेल बुकिंग आणि विमान प्रवासाचा अतिरिक्त खर्च आयसीसीला करावा लागेल.
अशा स्थितीत, जर बांगलादेशचे सामने भारताबाहेर हलवले गेले, तर त्यांच्यासोबत खेळणाऱ्या इतर संघांच्या खेळाडूंनाही नवीन ठिकाणी प्रवास करावा लागेल. यामुळे आयसीसीच्या खिशाला कात्री लागू शकते, पण बीसीसीआय किंवा संबंधित देशाच्या क्रिकेट बोर्डाला याचा फटका बसणार नाही.
टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सध्याच्या वेळापत्रकानुसार, बांगलादेशला इंग्लंड, इटली, नेपाळ आणि वेस्ट इंडिजसोबत ‘ग्रुप सी’ मध्ये ठेवण्यात आले आहे. बांगलादेशचा पहिला सामना (7 फेब्रुवारी) रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे.






