टी२० विश्वचषक २०२१ ची सुरुवात भारतीय संघासाठी अत्यंत निराशादायी राहिली. प्रथम पाकिस्तान आणि त्यानंतर न्यूझीलंड संघांनी भारतीय संघांवर मात केली. अखेर बुधवार रोजी (०३ नोव्हेंबर) भारतीय संघाने त्यांचे विजयाचे खाते उघडले आहे. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध भारताने ६६ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. या एका विजयाने त्यांचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग थोडा सोपा बनला आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २ विकेट्सच्या नुकसानावर तब्बल २१० धावा फलकावर लावल्या होत्या. सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १४० धावांची भागिदारी रचली होती. पुढे त्यांच्या विकेट गेल्यानंतर हार्दिक पंड्या (३५ धावा) आणि रिषभ पंत (२७ धावा) यांनी विस्फोटक फलंदाजी करत संघाची धावसंख्या २०० पार नेली.
भारताच्या २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानकडून फक्त करीम जनत (नाबाद ४२ धावा) आणि कर्णधार मोहम्मद नबी (३५ धावा) मोठ्या खेळी करू शकले. परिणामी २० षटकात ७ विकेट्सच्या नुकसाना अफगाणिस्तानचा संघ १४४ धावाच करू शकला आणि भारतीय संघाने ६६ धावांच्या फरकाने सामना खिशात घातला.
अशी आहेत समीकरणे
भारतीय संघाच्या या दणदणीत विजयानंतर त्यांच्या खात्यात २ गुणांची नोंद झाली आहे. याबरोबरच नेट रन रेटमध्येही चांगली वाढ झाली आहे. सध्या भारतीय संघ -१.६०९ वरुन ०.०७३ च्या नेट रन रेटवर आला आहे आणि गट २ मधील संघांच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तरीही अजून त्यांच्यापुढे न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघांचे आव्हान असेल. न्यूझीलंड संघ ३ पैकी २ सामने जिंकत ४ गुण आणि ०.८१६ नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानी आहे. तर अफगाणिस्तान संघ ४ पैकी २ सामने जिंकत ४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. नेट रन रेटमुळे अफगाणिस्तानचा संघ या स्थानी असला तरीही भारताविरुद्धच्या पराभवानंतर त्यांच्या नेट रन रेटमध्ये (१.४८१) घट झाली आहे.
अशाप्रकारे न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघांचे गुण भारतापेक्षा फक्त २ अंकांनी जास्त असल्यामुळे त्यांच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या अपेक्षा अजूनही जिवंत आहेत. याबरोबरच ७ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यावरही भारतीय संघाच्या आशा टिकून असतील.
जर अफगाणिस्तानने हा सामना जिंकला तर तिनीही संघांचे समान ६ गुण होऊ शकतात. अशावेळी नेट रन रेटच्या जोरावर उपांत्य फेरीचा दुसरा संघ निश्चित होईल. याउलट जर न्यूझीलंडने हा सामना जिंकला तर अफगाणिस्तानचा प्रवास तिथेच संपेल.
दुसरीकडे भारतीय संघाचे अजून २ सामने बाकी असून नामिबिया आणि स्कॉटलँड संघांशी त्यांचा सामना होणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी स्कॉटलँड, ८ नोव्हेंबर रोजी नामिबियाविरुद्धचा सामना होणार आहे. उपांत्य फेरीत जाण्यासाठी भारतीय संघाला हे दोन्हीही सामने मोठ्या अंतराने जिंकावेच लागणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘द्रविडची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड होणार असल्याची खेळाडूंना नव्हती कल्पना’, रोहितचा खुलासा
अजिंक्य रहाणेला १२ वर्षांपूर्वी ‘द वॉल’ राहुल द्रविडने दिला होता ‘हा’ लाखमोलाचा सल्ला