भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ चा थरार चालू आहे. आयपीएलचा हा हंगाम संपल्यानंतर १८ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या काळात भारतात टी२० विश्वचषक २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. परंतु भारतातील कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता आयसीसी टी२० विश्वचषक संयुक्त अरब अमिरातीत (युएई) हलवण्याच्या विचारात आहे. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने अद्याप हार मानलेली नाही.
युएईमध्ये टी२० विश्वचषक हलवणे ही एक आकस्मिक योजना असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. याबरोबरच टी२० विश्वचषक आयोजनाची ऑस्ट्रेलियासोबत अदलाबदल केल्याने २०२२ सालचा टी२० विश्वचषक कोण आयोजित करेल?, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
बीसीसीआयचे क्रिकेट विकास व्यवस्थापक आणि विश्वचषकाचे संचालक धिरज मल्होत्रा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. “टी२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल नक्की काय होईल, हे आताच सांगणे खूप घाईचे ठरेल. परंतु पर्यायी योजना म्हणून हा विश्वचषक युएईत हालवण्याचा विचार चालू आहे. असे असले तरीही, यजमानपद बीसीसीआयकडेच राहणार आहे,” असे मल्होत्रा यांनी सांगितले आहे.
भारतातील कोरोनाची परिस्थिती बिकट होण्यापुर्वी बीसीसीआयने टी२० विश्वचषक २०२१ च्या आयोजनाची कच्ची योजना आखून ठेवली होती. मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगलोर, हैदराबाद, धरमशाला, अहमदाबाद आणि लखनऊ या भारतातील वेगवेगळ्या शहरात विश्वचषकातील सामने खेळवण्याचे त्यांनी ठरवले होते.
परंतु भारतातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता आयसीसी ही स्पर्धा इतरत्र आयोजित करण्याचा विचार करू लागली आहे. एका वृत्तानुसार, आयसीसी सध्या भारतातील कोविडच्या स्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. म्हणूनच युएईला विश्वचषकासाठीचे राखीव ठिकाण म्हणून ठेवले आहे. जेणेकरुन भारतातील परिस्थिती सुधारली नाही तर हा विश्वचषक युएईमध्ये होऊ शकेल.
महत्त्वाच्या बातम्या-
वनडेत पदार्पण केल्यावरही रोहितसाठी ही ६ वर्ष ठरली अतिशय खराब
कृणालची एक अशीही बाजू! संघ सहकाऱ्याला दिली न शोभणारी वागणूक, सर्वत्र रंगली एकच चर्चा