काही दिवसांपूर्वीच आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला २ दिवसही पूर्ण होत नाही, तोच आयसीसीच्या पुढच्या स्पर्धेची तयारी सुरु झाली आहे. ही पुढची स्पर्धा म्हणजे यावर्षी होणारा टी२० विश्वचषक. या विश्वचषकाचा कालावधी काय असेल याबद्दल माहिती समोर येत आहे. हा विश्वचषक १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार संयुक्त अरब अमिरातीमध्ये १७ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होईल. तर १६ संघांत रंगणाऱ्या या स्पर्धेतील अंतिम सामना १४ नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. विशेष म्हणजे इंडियन प्रीमीयर लीग २०२१ चा उर्वरित हंगाम टी२० विश्वचषकापूर्वी १९ सप्टेंबरपासून युएईमध्येच खेळवला जाणार आहे. तसेच या हंगामाचा अंतिम सामना १५ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे त्यानंतर केवळ दोनच दिवसात टी२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.
पण असे असले तरी, टी२० विश्वचषकाच्या तारखांबद्दल अजून कोणतीही अधिकृत घोषणा आयसीसी किंवा बीसीसीआयकडून करण्यात आलेली नाही. खरंतर या विश्वचषकच्या आयोजनाची जबाबदारी बीसीसीआयकडे आहे, भारत या स्पर्धेचा यजमान आहे. मात्र, भारतातील कोविड-१९ ची परिस्थिती पाहाता हा विश्वचषक युएईमध्ये होईल, अशी चर्चा आहे.
तरी, अजून बीसीसीआयने हा विश्वचषक युएईमध्ये हलवण्याबाबत अधिकृत पत्र आयसीसीला लिहिलेले नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार हा विश्वचषक युएईमध्येच होण्याची दाट शक्यता आहे, तशा योजनाही आखण्यास सुरुवात झाली आहे. सध्याच्या योजनेप्रमाणे या विश्वचषकातील पहिली फेरी दोन गटात विभागून युएई आणि ओमान येथे खेळवली जाईल.
पहिल्या फेरीत ८ संघात १२ सामने होतील. त्यातील ४ संघ (प्रत्येक गटातील अव्वल २ संघ) सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर हे ४ संघ सुपर १२ फेरीत टी२० संघक्रमवारीत अव्वल ८ क्रमांकांवर असलेल्या संघांशी जोडले जातील. सुपर १२ फेरीत ३० सामने होतील. हे सामने २४ ऑक्टोबरपासून होतील. या फेरीत १२ संघांची २ गटात विभागणी होईल. म्हणजे प्रत्येक गटात ६ संघ असतील. हे सामने युएईमध्ये दुबई, अबुधाबी आणि शारजाह या ३ शहरात खेळवले जातील. त्यानंतर उपांत्यफेरी आणि अंतिम सामना होईल.
पहिल्या फेरीत खेळणाऱ्या ८ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलंड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी या देशांचा समावेश असेल.
आयसीसीने १ जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये बीसीसीआयला एक महिन्याचा कालावधी दिला होता. या कालावधीमध्ये बीसीसीआयला भारतात टी२० विश्वचषकाचे आयोजन होऊ शकते की नाही, याबद्दल अंतिम निर्णय द्यायचा होता. त्यामुळे बीसीसीआय अधिकृतपणे याबद्दल कधी घोषणा करणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ भारतीय खेळाडूची क्रश आहे दिशा पटानी, इंग्लंड आहे सुट्टीसाठी आवडते ठिकाण
जोस बटलर दुखापतीमुळे ‘या’ महत्त्वाच्या मालिकेतून बाहेर, टी२० स्पेशालिस्टची संघात निवड
“हा जल्लोष अनेक दिवस चालणार” WTC विजेतेपद मिळवून दिल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूची प्रतिक्रिया