गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने कसोटी आणि वनडेमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. केवळ टी-20 फॉरमॅटमध्येच भारताने शानदार प्रदर्शन केले आहे, ज्यामुळेच ते सध्या टीममध्ये टिकून आहेत. टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये गंभीरची खरी परीक्षा होणार आहे. जर टीम इंडियाने ट्रॉफी आपल्या नावावर केली नाही, तर गंभीर पुन्हा एकदा चाहत्यांच्या निशाण्यावर असतील. माजी भारतीय खेळाडू मनोज तिवारीने (Manoj Tiwari) आता गंभीरला इशारा देत मोठे विधान केले आहे.
टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर नेहमीच टीकाकारांच्या निशाण्यावर असतात. केकेआरमध्ये त्यांच्यासोबत खेळलेल्या मनोज तिवारीने ‘इनसाइड स्पोर्ट्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, जर भारत टी-20 वर्ल्ड कप जिंकला नाही, तर मला वाटते की बीसीसीआयने गौतम गंभीरबाबत एक मोठा आणि कठीण निर्णय घ्यायला हवा. बीसीसीआय सचिवांनी आधीच स्पष्ट केले आहे की, गंभीरचा करार संपेपर्यंत तो पदावर राहील आणि त्याला हटवण्याचा प्रश्नच येत नाही. पण मला वाटते की 2026 टी-20 वर्ल्ड कपमध्ये जर अपेक्षित निकाल मिळाला नाही, तर बीसीसीआय त्याला हटवेल आणि मोठा निर्णय घेईल. यापूर्वीही अनेकदा मनोज तिवारीने गंभीरवर टीका केली आहे.
माजी खेळाडू मनोज तिवारीचे असे मत आहे की, व्हीव्हीएस लक्ष्मण (V. V. S. Laxman) टीम इंडियासाठी अधिक चांगले प्रशिक्षक ठरू शकतात. लक्ष्मण यांनी अनेकदा राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे कोचिंग केले आहे. लक्ष्मण यांच्याबद्दल बोलताना मनोज तिवारी म्हणाला की, मला वाटते की ही एक प्रोसेस-ड्रिवन गोष्ट असायला हवी. जेव्हा राहुल द्रविड कोच होते आणि काही दौऱ्यांवर जात नसत, तेव्हा व्हीव्हीएस लक्ष्मण जात असत. त्यामुळे तेच पहिली पसंती असायला हवे होते. लक्ष्मण गेल्या अनेक वर्षांपासून बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे प्रमुख आहेत.






