क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात कोणत्या क्षणी काय होईल, हे कदाचित कुणीच सांगू शकत नाही. इथे एका सामन्यात विक्रम घडतात आणि त्याच सामन्यात विक्रम मोडलेही जातात. काही वेळा अशीही वेळ येते की, शानदार कामगिरी करणाऱ्या गोलंदाजाला मान खाली घालायची वेळ येते. असेच काहीसे घडले होते, जेव्हा एका गोलंदाजाला एका सामन्यात हॅट्रिक घेत शानदार कामगिरी केल्यानंतर त्याच सामन्यात एका षटकात 6 षटकारांचा सामना करावा लागला होता. यानंतर त्या खेळाडूला समजत नव्हते की, त्याने हॅट्रिकचा आनंद साजरा करावा की, 6 षटकाराचे दु:ख
तो खेळाडू इतर कुणी नसून श्रीलंकेचा फिरकीपटू अकिला धनंजय (Akila Dananjaya) आहे. त्याला मार्च 2021मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 सामन्यात अशा स्थितीचा सामना करावा लागला होता. सामन्यात त्याने वेस्ट इंडिजच्या वरच्या तीन फलंदाजांना सलग तीन चेंडूत बाद करत तंबूत धाडले होते. मात्र, कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने त्याला सलग 6 चेंडूत 6 षटकार मारत बोलती बंद केली होती. पोलार्डच्या फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने 4 विकेट्सने सामना खिशात घातला होता.
अँटिग्वा येथील कोलाईड क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या टी20 सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी केली होती. त्यांनी 20 षटकात 9 विकेट्स गमावत 131 धावा केल्या होत्या. यात पाथु निसंका (39) आणि निरोशन डिकवेला (33) यांच्याव्यतिरिक्त श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाने खास कामगिरी केली नव्हती. यावेळी वेस्ट इंडिजसाठी ओबेद मॅकॉय याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या होत्या, तर इतर गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या डावातील चौथ्याच षटकात अकिला धनंजयने सलग तीन चेंडूत इविन लुईस, ख्रिस गेल आणि निकोलस पूरन यांना बाद करत हॅट्रिक घेतली होती. यावेळी लुईसने 28 धावा केल्या होत्या, तर गेल आणि पूरन शून्यावर बाद झाले होते.
धनंजयच्या हॅट्रिकमुळे 3.4 षटकानंतर वेस्ट इंडिज संघ 3 विकेट्स गमावत 52 धावांवर खेळत होता. यानंतर लेंडल सिमन्स यानेही 26 धावांवर लवकर विकेट गमावली होती. यानंतर सहाव्या षटकात कायरन पोलार्ड मैदानात आला. त्याने धनंजयच्या तिसऱ्या षटकातील सर्व चेंडूंवर षटकार मारत 36 धावा केल्या. त्यानंतर 5 षटकांनंतर 4 बाद 62 धावांवरून संघाचा डाव थेट 6 षटकांनंतर 4 बाद 94 धावांवर पोहोचवला होता.
अशी कामगिरी करत त्याने युवराज सिंग याच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील एका षटकात 6 षटकार मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली होती. पोलार्डने या सामन्यात 11 चेंडूत 38 धावा करत तंबूचा रस्ता धरला होता. मात्र, त्याच्या खेळीमुळे वेस्ट इंडिज संघाने 13.1 षटकात 6 विकेट्स गमावत आव्हान गाठले होते. पोलार्डच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. (t20i sri lanka bowler akila dhananjay took hat trick he faced the shame of 6 sixes in the same match)
महत्वाच्या बातम्या-
महिलांच्या प्रदर्शनीय लढतीत स्मृती मंधानाच्या ब्लू संघाची विजयी सलामी, शिवाली ठरली ‘POM’ पुरस्काराची मानकरी
बुमराहच्या पुनरागमनावर शास्त्रींची चेतावणी; आफ्रिदीचे उदाहरण देत म्हणाले, ‘तुम्ही त्याला 4 महिने…’