दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात झाला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकात २ विकेट्स गमावत पूर्ण केले आणि विजेतेपद आपल्या नावावर केले.
ऑस्ट्रेलियाकडून १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी डेव्हिड वॉर्नर आणि ऍरॉन फिंच ही सलामी जोडी मैदानात उतरली होती. मात्र, फिंच फार काळ टिकू शकला नाही. तो ५ धावा करुन तिसऱ्या षटकात ट्रेंट बोल्टविरुद्ध बाद झाला. मात्र, यानंतर वॉर्नरला मिशेल मार्शने भक्कम साथ देत विजयाचा पाया रचला. दरम्यान, दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकेही झळकावली.
वॉर्नर या खेळीदरम्या टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याला ट्रेंट बोल्टनेच १३ व्या षटकात त्रिफळाचीत केले. वॉर्नरने ३८ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावा केल्या. मार्शने ३१ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने अखेरपर्यंत किल्ला लढवत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. त्याने ५० चेंडूत नाबाद ७७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ४ षटकार मारले. ग्लेन मॅक्सवेल २८ धावांवर नाबाद राहिला.
विलियम्सनचे कर्णधाराला साजेसे अर्धशतक
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टील आणि डॅरिल मिशेल यांनी डावाची सुरुवात केली. पण, मिशेल फार काळ टीकू शकला नाही. त्याला चौथ्या षटकात जोश हेजलवूडने बाद केले. मिशेलने ११ धावा केल्या. दरम्यान, मार्टिन गप्टीलने धीमी खेळी केली. पण, दुसऱ्या बाजूने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लाबोल केला.
या दोघांनी न्यूझीलंडचा डाव पुढेला नेला होता, मात्र, मार्टिन गप्टीलला १२ व्या षटकात २८ धावांवर ऍडम झम्पाने बाद केले. यानंतर ग्लेन फिलिप्सने विलियम्सनला चांगली साथ देताना अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र, फिलिप्सला १८ धावांवर १८ व्या षटकात हेजलवूडने बाद केले. याच षटकात हेजलवूडने केन विलियम्सनचा अडथळाही दूर केला. विलियम्सनने ४८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह ८५ धावा केल्या.
यानंतर जिमी निशामने टीम सिफर्टच्या साथीने न्यूझीलंडला २० षटकांअखेर १७२ धावांपर्यंत पोहचवले. निशाम १३ धावांवर आणि सिफर्ट ८ धावांवर नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर ऍडम झम्पाने १ विकेट घेतली.
असे आहेत दोन्ही संघ
या दोन्ही संघांना रविवारी पहिल्यांदाच टी२० विश्वचषकाचे विजेतेपद जिंकण्याची संधी असणार आहे. अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडला एक बदल करावा लागला आहे. त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज डेवॉन कॉनवे अंतिम सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याच्याऐवजी न्यूझीलंडने टीम सिफर्टला संधी दिली आहे. ऑस्ट्रेलियाने मात्र, अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही.
असे आहेत ११ जणांचे संघ –
न्यूझीलंड: मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, केन विलियम्सन (कर्णधार), टिम सिफर्ट (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, जेम्स निशाम, मिशेल सँटनर, ऍडम मिल्ने, टिम साउथी, ईश सोधी, ट्रेंट बोल्ट
ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, ऍरॉन फिंच (कर्णधार), मिशेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, ऍडम झम्पा, जोश हेझलवूड