या वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी भारतासाठी एक मोठी बातमी आहे. 41 वर्षीय टेबल टेनिसपटू आणि कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन शरथ कमल यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा ध्वजवाहक असेल. याशिवाय अनुभवी बॉक्सर आणि सहा वेळची विश्वविजेती एमसी मेरी कोम आणि हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या शिवा केशवनची भारतीय दलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं (IOA) याची घोषणा केली.
लंडन ऑलिम्पिक 2012 मधील कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंग शूटिंग रेंजमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करेल. ऑलिम्पिकमधील शूटिंग रेंज मुख्य ठिकाणापासून दूर आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत नेमबाजीतील आपला सर्वात मोठा संघ पाठवणार आहे. भारतानं आतापर्यंत ऑलिम्पिकसाठी 19 नेमबाजांचा कोटा मिळवला आहे. यावर्षी पॅरिस ऑलिम्पिक 17 दिवस चालणार आहे. हे गेम्स 26 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत.
टेबल टेनिस सांघिक स्पर्धेत भारताचे पुरुष आणि महिला संघ त्यांच्या क्रमवारीच्या आधारे प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकसाठी मिळालेल्या या जबाबदारीनंतर प्रतिक्रिया देताना शरथ कमल म्हणाला की, “ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित न होण्यापासून तर गेल्या आठवड्यात सिंगापूरमधील कामगिरी, क्रमवारीत 54 स्थानांची झेप आणि आता ध्वजवाहक म्हणून नियुक्ती, गेले तीन आठवडे माझ्यासाठी अविश्वसनीय होते! हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. हे माझं पाचवं आणि शेवटचं ऑलिम्पिक असलं तरीही ते एखाद्या परीकथेसारखे आहे. आत्ताच मला IOA कडून फोन आला आणि माझा त्यावर विश्वासच बसला नाही. जगातील बहुतांश टेबल टेनिसपटूंना हा सन्मान मिळत नाही.”
या निर्णयानंतर, IOA अध्यक्षा पीटी उषा म्हणाल्या की, ‘पॅरिस ऑलिम्पिक गेम्समध्ये आमच्या दलाचं नेतृत्व करण्यासाठी अधिकाऱ्यांचा इतका प्रतिष्ठित आणि सक्षम संघ मिळाल्याचा खूप आनंद आहे. खेळातील त्यांचं कौशल्य, समर्पण आणि आवड आमच्या खेळाडूंना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी नक्कीच प्रेरणा देईल.”
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नईचं कर्णधारपद सोडल्यानंतर काय आहे धोनीचा भविष्यातील प्लॅन? ऋतुराजकडे नेतृत्व का दिलं?
काय सांगता! सरफराज खानच्या वडिलांसोबतही क्रिकेट खेळला आहे हिटमॅन!
IPL 2024 साठी एबी डिव्हिलियर्सचं भाकीत, म्हणाला, ‘हा’ भारतीय खेळाडू करेल दमदार कामगिरी