2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीगचा पहिला हंगाम खेळला गेला. क्रिकेटचाहते तेव्हापासून महेंद्रसिंह धोनीला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून पाहतायेत. मात्र आता त्याचा कर्णधारपदाचा प्रवास संपला आहे. आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी त्यानं चेन्नईच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेऊन क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली. आयपीएलच्या आगामी हंगामात मराठमोळा ऋतुराज गायकवाड सीएसकेचं नेतृत्व करताना दिसेल. आता एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आलाय की धोनीनं कर्णधारपद सोडलं कारण तो पुढच्या वर्षी निवृत्त होणार आहे!
पीटीआयच्या वृत्तानुसार, महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या या हंगामाच्या अखेरीस निवृत्ती घेईल. चेन्नईला धोनीच्या उपस्थितीत संघात सुरळीत संक्रमण हवं आहे. यापूर्वी फ्रँचायझीनं 2022 मध्ये कर्णधार बदलण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी संघाचं कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आलं होतं. मात्र 8 सामन्यांनंतरच दडपण सहन करता न आल्यानं जडेजानं धोनीकडे पुन्हा कर्णधारपद सोपवलं.
चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन धोनीनं कर्णधारपद सोडल्याबद्दल म्हणाले की, “धोनी जे काही करतो ते संघासाठी चांगलं असतं. कर्णधारांच्या बैठकीपूर्वी मला याची माहिती मिळाली. तुम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करायला हवा. हा निर्णय सर्वस्वी त्याचा आहे.”
महेंद्रसिंह धोनीनं 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु तो त्यानंतर आयपीएलमध्ये खेळत राहिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडल्यानंतर धोनीनं त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईला 2021 आणि 2023 मध्ये चॅम्पियन बनवलं. आता संघाची कमान युवा ऋतुराज गायकवाडच्या हाती असेल.
ऋतुराज 2020 पासून सीएसके सोबत आहे. त्यानं सप्टेंबर 2020 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून त्यानं 52 सामन्यांच्या 52 डावांत 1797 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 39.07 आणि स्टाइक रेट 135.52 एवढा राहिला. ऋतुराजच्या नावावर आयपीएलमध्ये 14 अर्धशतकं आणि एक शतक आहे. त्यानं 2021 हंगामात सर्वाधिक धावा करत ‘ऑरेंज कॅप’ जिंकली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
मराठमोळ्या ऋतुराजची कर्णधार होताच पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाला,’ मला फार काही…
चॅम्पियन्स युगाचा अंत! ना धोनी.. ना रोहित.. ना विराट, युवा खेळाडू बनले आयपीएल संघांचे कॅप्टन
IPL 2024 मध्ये धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल? काय असेल त्याची संघातील भूमिका?