मुंबई । मुंबई क्रिकेट असोशिएशनला सध्या तीन मोठ्या कंपन्यांकडून वानखेडे स्टेडियमच्या नावाच्या हक्कांसाठी प्रस्ताव आला आहे. त्यात आयएमजी रिलायन्स, डीडीबी मुद्रा आणि बेसलाइन या कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी एका कंपनीचं नाव एकतर मैदानाच्या नावाच्या आधी किंवा नंतर लावेल जाणार आहे.
मुंबई क्रिकेट असोशिएशनचे सचिव पीव्ही शेट्टी म्हणाले, “तीन कंपन्यांनी त्यांचे प्रस्ताव मांडले आहेत. मैदानाचे मूळ नाव ठेवून त्याला पुढे किंवा पाठीमागे कंपनीचं नाव जोडलं जाणार आहे. यावर सुरुवातीची चर्चा सुरु असून अजून कोणतंही निर्णय झाला नाही. “
“मुंबई क्रिकेट असोशिएशनला यातून एकूण १०० कोटी रक्कम अपेक्षित असून त्याचा कालावधी ५ वर्ष असेल. “ असेही ते पुढे म्हणाले.
कोणती कंपनी देणार किती पैसे ?
इंडिया टुडेमधील एका बातमी प्रमाणे आयएमजी रिलायन्स, डीडीबी मुद्रा आणि बेसलाइन या तीन कंपन्यांपैकी डीडीबी मुद्रा कंपनी ४५ कोटी रुपये, आयएमजी रिलायन्स १२ ते १५ कोटी आणि बेसलाइन ५ ते ६ कोटी वर्षाला द्यायला तयार आहेत. २०१६ साली देखील डीडीबी मुद्रा कपंनीने यात रस दाखवला होता. परंतु काही कारणांमुळे हा करार होऊ शकला नाही. येत्या १० दिवसात हा निर्णय होणार असल्यामुळे कोणत्या कंपनीचे नाव या मैदानाच्या नावापुढे लागते हे पाहणे औत्युक्याचे ठरेल.
कुणाच्या नावावरून दिले मैदानाला वानखेडे नाव?
या मैदानाला वानखेडे स्टेडियम हे नाव बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष राहिलेल्या शेषराव कृष्णराव वानखेडे यांच्या नावावरून देण्यात आले आहे. ते १९८०-८१ आणि १९८२-८३ भारतीय क्रिकेट बोर्डाचे तर १९६३ पासून ते १९८८ पर्यंत मुंबई क्रिकेट असोशिएशनसह अध्यक्ष राहिले होते.
इतिहास:
या मैदानावर २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना, सचिनचा २००वा कसोटी सामना, विंडीज विरुद्धची टाय कसोटी, १९८७, १९९६ विश्वचषक लढती आणि २०१६ टी२० विश्वचषकाच्या लढती झाल्या आहेत. दक्षिण मुंबईमध्ये असलेल्या या मैदानाला मुंबईकरांच्या मनात एक खास स्थान आहे. जगभरातून येथे अनेक क्रिकेटप्रेमी खास सामने पाहायला येतात. नोव्हेंबर महिन्यात अनेक कसोटी सामने या मैदानावर झाले आहेत. मास्टर ब्लस्टर सचिन तेंडुलकरचे हे होम ग्राउंड असून अनेक दिग्गज खेळाडू या मैदनाने भारताला दिले आहेत.