तमिळनाडू क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू व आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य राहिलेल्या यो महेशने वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रविवारी सायंकाळी त्याने स्वतः ट्विट करून याची माहिती दिली. महेशने २०१० व २०१२ असे दोन वर्ष चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व केले होते. त्याआधी तो वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वात दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी खेळला होता.
क्रिकेट सोडण्याची ही योग्य वेळ
भारताकडून २००६ च्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात खेळलेला महेश गेले काही दिवस दुखापतीने त्रस्त होता. आपल्या निवृत्तीची घोषणा करताना तो म्हणाला, “मला वाटते क्रिकेट सोडण्याची ही योग्य वेळ आहे. मला जे मिळवायचे ते मिळवलेय. दुखापती नसत्या तर मी आणखी काही वर्ष खेळ असतो. मात्र, आता ही माझ्या मनात काहीही राहिले नाही. भारताकडून १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक खेळणे माझ्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण राहिला. तमिळनाडूकडून खेळायला मिळाल्याने मी स्वतःला भाग्यशाली समजतो.”
महेशने आपल्या प्रतिक्रियेत पुढे म्हटले, “मी बीसीसीआय, तमिळनाडू क्रिकेट संघटना आणि इंडिया सिमेंटचे आभार मानतो. या सर्वांनी मला अनेकदा संधी देत स्वतःला सिद्ध करायला लावले. माझे कुटुंब आणि मित्रांचे देखील या कालावधीत मला मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचादेखील मी कायम ऋणी राहील. मला यापुढेही या खेळाशी जोडून राहायचे आहे. कदाचित मी भविष्यात प्रशिक्षक म्हणून कारकीर्द घडवू शकतो.”
— Yomahesh Vijayakumar (@yomi2105) December 20, 2020
तमिळनाडूसाठी बजावली आहे अष्टपैलू कामगिरी
महेशने तमिळनाडूसाठी ५० प्रथमश्रेणी सामने खेळताना १,११९ धावा काढल्या आहेत. यात २ शतकांचा समावेश देखील आहे. सोबतच, महेशच्या नावे १०८ बळी देखील जमा आहेत. महेशने तमिळनाडूसाठी ६१ लिस्ट ए व ४६ टी२० सामने खेळताना अनुक्रमे ९३ व ५२ बळी आपल्या नावे केले होते.
आयपीएलमध्ये केली होती चमकदार कामगिरी
महेशने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघासाठी केली. वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वात पहिल्याच हंगामात १६ बळी मिळवून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर मात्र त्याला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. २०१२ मध्ये धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा तो सदस्य होता.
महत्वाच्या बातम्या:
– पाकिस्तानचा सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभव, न्यूझीलंडची मालिकेत विजयी आघाडी
– नवी आयसीसी क्रमवारी जाहीर; मैदानापाठोपाठ इथेही भारतीयांच्या उडाल्या दांड्या
– दुःखद! कोरोनामुळे सचिनच्या जिवलग मित्राचा मृत्यू, एकेकाळी सोबत खेळले होते क्रिकेट