श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत भारताच्या पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या भारताच्या साकेत मायनेनीला दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे ब्राझीलच्या थियागो मॉन्टेरोला संधी देण्यात आली. स्पर्धेत फ्रांसच्या पाचव्या मानांकित बेनॉय पेर याने लकी लुझर ठरलेल्या ब्राझीलच्या थियागो मॉन्टेरोचा 7-6(5), 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. अतितटीच्या झालेल्या या लढतीत 1तास 27मिनिटे चाललेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी जोरदार खेळ करत आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये बेनॉय पेर याने तिसऱ्या गेममध्ये मॉन्टेरोची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 7-6(5)असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली.दुसऱ्या सेटमध्ये बेनॉय पेर याने मॉन्टेरोची तिसऱ्या गेमला सर्व्हिस भेदली व सामन्यात 2-1 अशी आघाडी निर्माण झाली. त्यानंतर आघाडीवर असलेल्या बेनॉय याने आपले वर्चस्व कायम राखत मॉन्टेरोची नवव्या गेमला सर्व्हिस भेदली हा सेट 6-3अशा फरकाने जिंकून विजय मिळवला.
अन्य लढतीत क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याने क्वालिफायर कॅनडाच्या फेलिक्स ऑगर अलियास्मीवर 6-4, 7-5 असा पराभव केला. हा सामना 1तास 14 मिनिटे चालला. दुसऱ्या सामन्यात इटलीच्या क्वालिफायर सिमॉन बोलेल्ली याने उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिनचा 6-4, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी):
इवो कार्लोविच(क्रोएशिया)वि.वि. फेलिक्स ऑगर अलियास्मी(कॅनडा) 6-4, 7-5;
सिमॉन बोलेल्ली(इटली)वि.वि. डेनिस इस्तोमिन(उझबेकिस्तान)6-4, 6-4;
बेनॉय पेर(फ्रांस)(5)वि.वि.थियागो मॉन्टेरो(ब्राझील) 7-6(7-5), 6-3.