टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्कोर नेपाळच्या संघानं बनवला आहे. नेपाळनं टी20 मध्ये एकदा चक्क 314 धावा ठोकल्या होत्या. मात्र तुम्हाला माहित आहे का, की टी20 आंतरराष्ट्रीय मध्ये सर्वात कमी धावांचा विक्रम कोणत्या संघाच्या नावे आहे? नाही ना. तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा लाजिरवाणा विक्रम मंगोलियाच्या संघानं केला आहे. हा संघ नुकताच अवघ्या 10 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात, सिंगापूरनं 5 चेंडूत 13 धावा करून 9 विकेटनं सामना जिंकला. अशाप्रकारे, 120 चेंडूचा सामना अवघ्या 5 चेंडूत समाप्त झाला. ही टी20 आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधील संयुक्त सर्वात छोटी धावसंख्या आहे. गेल्या वर्षी ‘आयल ऑफ मॅन’ संघानं स्पेनविरुद्ध एवढाच स्कोर केला होता.
टी20 विश्वचषकाच्या आशिया क्वालिफायर सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करताना मंगोलियाचा संघ 10 षटकांत 10 धावा करून गारद झाला. या सामन्यात मंगोलियाचा रन रेट प्रति ओव्हर केवळ 1 धाव होता. टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच संघानं एवढ्या हळू वेगानं धावा बनवलेल्या नाहीत. ‘आयल ऑफ मॅन’ संघानं स्पेनविरुद्ध 1.5 च्या रन रेटनं धावा केल्या होत्या.
11 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सिंगापूरनं पहिल्याच चेंडूवर विकेट गमावली. मात्र पुढच्या 4 चेंडूत संघानं निर्धारित लक्ष्य गाठलं. मंगोलियाच्या संघानं या स्पर्धेत आपले चारही सामने गमावले आहेत. सिंगापूरसाठी हर्षा भारद्वाजनं 4 षटकांत 3 धावा देऊन 6 बळी घेतले. टी20 आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही गोलंदाजाची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. मंगोलियाचे 5 फलंदाज शून्यावर बाद झाले. तर 10 पैकी 3 ओव्हर मेडन गेले.
हेही वाचा –
आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारे टाॅप-5 फलंदाज
6 षटकात 113 धावा; कांगारुंचा विश्वविक्रम, ट्रॅव्हिस हेडची वादळी खेळी
कोहलीपासून धोनीपर्यंत कोणी भरला सर्वाधिक कर, ‘या’ दिग्गजाने भरले 66 कोटी रूपये