संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष सध्या संयुक्त अरब अमिरातीत (युएई) होणाऱ्या आशिया चषकावर लागून आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे आशियाई संघ आशिया चषक जिंकण्यासाठी आपले सर्वोत्कृष्ट देताना दिसतील. या स्पर्धेतील बहुप्रतिक्षित सामना, भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी (२८ ऑगस्ट) दुबईत रंगणार आहे. या सामन्यापूर्वी जाणून घेऊया, अशा ३ भारतीय क्रिकेटपटूंबद्दल, जे त्यांच्या प्रदर्शनाने विरोधी संघाच्या जबड्यातून विजय खेचून आणू शकतात. त्याच खेळाडूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
१. आर अश्विन
भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन आशिया चषक २०२२ विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. अश्विनला आयसीसीच्या स्पर्धा खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्याने २०१२, २०१४, २०१६ आणि २०२१ चा आयसीसी टी२० विश्वचषक खेळला आहे. तसेच त्याने २०११ आणि २०१५ वनडे विश्वचषकातही भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. २०१३ आणि २०१७ सालच्या आयसीसी चँपियन्स ट्रॉफीचाही तो भाग राहिलाय.
याशिवाय त्याचे टी२० क्रिकेटमधील प्रदर्शनही चांगले राहिले आहे. अश्विनने भारताकडून ५४ टी२० सामने खेळताना ६४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची टी२०तील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ८ धावांवर ४ विकेट्स इतकी आहे.
२. हार्दिक पंड्या
आयपीएल २०२२ मधील दमदार प्रदर्शनानंतर हार्दिक पंड्या याने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. तेव्हापासून तो भारताच्या बहुतेक सामन्यांचा भाग आहे. हार्दिक आशिया चषकात भारताकडून मधल्या किंवा खालच्या फळीत मॅच विनर सिद्ध होऊ शकतो. तसेच गोलंदाजीतही तो महत्त्वपूर्ण प्रदर्शन करू शकतो. पंड्याने आतापर्यंत भारताकडून ६७ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ८३४ धावा आणि ५० विकेट्सची कामगिरी केली आहे.
३. सूर्यकुमार यादव
भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव आशिया चषकात विरोधी संघांच्या गोलंदाजांवर चांगलाच दबाव निर्माण करू शकतो. तो मैदानात ३६० डिग्री फटकेबाजी करण्याची क्षमता राखतो. तसेच त्याच्याकडे स्ट्राईक रोटेट करण्याचेही चांगले कौशल्य आहे. तो सध्या आयसीसीच्या टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. टी२० क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत २३ सामने खेळताना २६४४ धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान महामुकाबल्याच्या तिकीट विक्रीला सुरुवात! जाणून घ्या काय आहे किंमत
पाकिस्तानने आशिया चषकासाठी निवडले दोन ‘छुपे रुस्तम’, भारतासाठी ठरत आहेत धोक्याची घंटा!
माजी पाकिस्तानी कर्णधाराची मनापासून इच्छा, PAKविरुद्ध भारताच्या इलेव्हनमध्ये असावा ‘हा’ मॅच विनर