भारतीय क्रिकेटपटू व्यंकटेश अय्यर आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी चमकदार कामगिरी केल्यानंतर आता वन-डे कप आणि काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. त्यानं इंग्लिश काउंटी संघ लँकेशायरशी करार केला आहे. व्यंकटेशनं आयपीएल 2024 हंगामात केकेआरला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं.
केकेआरच्या या स्फोटक फलंदाजानं लँकेशायरसोबत पाच आठवड्यांचा करार केला आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या दुलीप ट्रॉफीपूर्वी तो भारतात परतेल. अय्यर काउंटी चॅम्पियनशिप आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करेल. याद्वारे त्याला टीम इंडियामध्ये पुनरागमन करायचं आहे. अय्यरनं शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो भारतीय संघात परतलेला नाही.
भारतीय खेळाडूंनी ऑफ-सीझनमध्ये काउंटी संघांकडून खेळणं आता सामान्य झालं आहे. अलीकडेच अजिंक्य रहाणेनं लीसेस्टरशायरशी करार केला होता. त्यानं पहिल्याच सामन्यात शानदार अर्धशतकही झळकावलं. अय्यर प्रथमच इंग्लिश काउंटी संघाकडून खेळण्यासाठी खूप उत्साहित आहे. लँकेशायर क्रिकेटनं जारी केलेल्या निवेदनात तो म्हणाला, “माझ्या कारकिर्दीत प्रथमच इंग्लंडला जाऊन काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. लँकेशायर ही एक अतिशय ऐतिहासिक काउंटी आहे, जिच्या क्लबमध्ये भारतीय खेळाडूंनी खेळण्याचा मोठा इतिहास आहे. मी फारुख इंजिनियर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वॉशिंग्टन सुंदर प्रमाणे या क्लबकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे.”
व्यंकटेश पुढे म्हणाला की, एकदिवसीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील माझ्या कौशल्याची इंग्लिश परिस्थितीत चाचणी घेणं माझ्या खेळासाठी फायदेशीर ठरेल. मला आशा आहे की मी चाहत्यांचं मनोरंजन करू शकेन.” लँकेशायरचे क्रिकेट परफॉर्मन्स डायरेक्टर मार्क चिल्टन म्हणाले, “एकदिवसीय चषकादरम्यान व्यंकटेशच्या अनुभवाचा युवा संघाला फायदा होईल. मधल्या फळीत तो स्फोटक फलंदाजीचा पर्यायही देईल. त्याच्या आगमनानं आम्हाला गोलंदाजीचा पर्यायही मिळेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
आशिया चषक 2024 : सेमिफायनलमध्ये रेणुका सिंगचा कहर! भारताचा सलग नवव्यांदा फायनलमध्ये प्रवेश
गौतम गंभीरचा स्पेशल प्लॅन, टीम इंडियातही होणार केकेआर प्रमाणे प्रयोग! हा खेळाडू घेणार सुनील नारायणची जागा
पंजाब किंग्जचं नशीब बदलेल? रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दिग्गज बनू शकतो मुख्य प्रशिक्षक