Loading...

असा आहे टीम इंडियाचा पुण्यातील कसोटी सामन्याचा इतिहास

उद्यापासून(10 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे होणार आहे. या सामन्याला उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वा सुरुवात होईल.

भारताचा या स्टेडीयमवरील हा केवळ दुसराच कसोटी सामना असणार आहे. याआधी भारतीय संघ या स्टडीयमवर फेब्रुवारी 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. मात्र भारतासाठी हा सामना संघर्षपूर्ण ठरला. या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला होता.

विशेष म्हणजे मागील 6 वर्षांपासूनचा भारताचा मायदेशातील हा एकमेव कसोटी सामन्यातील पराभव आहे.

भारताने 1 जानेवारी 2013 पासून मायदेशात आत्तापर्यंत 30 कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील केवळ गहुंजेला झालेल्या सामन्यात भारताने पराभव स्विकारला आहे. अन्य 24 सामन्यात भारताने विजय मिळवले आहेत. तर 5 सामने अनिर्णित राहिले आहेत.

फेब्रुवारी 2017 ला गहुंजेला ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून स्टिफन ओ किफने 12 विकेट्स घेतल्या होत्या. तर स्टिव्ह स्मिथने दुसऱ्या डावात महत्त्वपूर्ण 109 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

पण आता भारतीय संघ जवळ जवळ 2 वर्षांनंतर गहुंजेच्या स्टेडियमवर कसोटी सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. त्यामुळे या स्टेडीयमवर पहिला कसोटी विजय मिळवण्याबरोबरच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजय आघाडी घेण्याचाही भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

पण त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकाही मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असेल. या मालिकेतील विशाखापट्टणमला झालेला पहिला कसोटी सामना भारताने जिंकला आहे.

Loading...
You might also like
Loading...