गतविजेता आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये सुपर-८मध्ये पोहोचला आहे, मात्र संघाची वरची फळी चिंतेचा विषय बनली आहे. भारताचा एक सलामीवीर अभिषेक शर्मा सुरूवातीपासूनच धावा करण्यात अपयशी ठरत आहे. तो बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या तिलक वर्माने तरी जबाबदारी घेत फलंदाजी करावी तर तो ही निराशा करत आहे.
चाहते अभिषेक कितीदा शून्यावर बाद झाला याच्या चर्चा करत आहेत. तिलकच्या आकडेवारीवरही एकदा नजर टाकली तर तो पण काही नीट खेळत नाही असे दिसून येते. त्याने पाच डावांमध्ये १०७ धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी २१.४० अशी राहिली असून स्ट्राईक रेट ११८.८८ आहे. ही आकडेवारी टी२० मध्ये तिसऱ्या क्रमांकासाठीच्या फलंदाजासाठी योग्य नाही
भारताचे दिग्गज सुनील गावसकर यांनीही भारतीय फलंदाजीबाबत निराशा व्यक्त केली होती. त्यांनी तिलकच्या फलंदाजीबद्दल म्हटले, विकेट पडल्यावर फलंदाजांनी आक्रमकपणा न दाखवता संयमाने खेळले पाहिजे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रनरेट ९.५ होता, १५ नाही. अशावेळी समजुतीने खेळले पाहिजे होते आणि डाव स्थिर केला पाहिजे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना तिलकचे बाद होणे डोकेदुखी वाढवणारे ठरत आहे. तिलकने दुसऱ्या चेंडूवर मार्को यान्सेनला पुढे येत शॉट खेळण्याच्या प्रयत्नात विकेट गमावून बसला. तो चेंडू बॅटची कड घेत विकेटकीपर क्विंटन डी कॉकने तो झेलला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अभिषेकने या स्पर्धेतील त्याची पहिली धाव घेतली, मात्र तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. तो १२ चेंडूत १५ धावा करत यान्सेनचा शिकार झाला. टी२०च्या जागतिक क्रमवारीत फलंदाजीत अव्वल स्थानावर असलेल्या अभिषेकच्या आत्मविश्वासाच कमी दिसून येत आहे.
या स्पर्धेत भारत एक चूक करत आहे. भारताचे पहिले तिन्ही फलंदाज डाव्या हाताचे आहेत, ज्यामुळे विरोधी संघाला सामन्याची सुरूवात करायला चांगले जात आहे. ते स्पिनर्सला आणत आहेत आणि विकेट्स घेत आहेत. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असेच झाले. पाकिस्तानकडून सलमान आगाने अभिषेकला आणि दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मार्करमने ईशान किशनला बाद केले.
भारताच्या फलंदाजांची स्थिती अशी वाईट असताना संजू सॅमसनला पुढील सामन्यात खेळवले जाऊ शकते, असे भारताचे असिस्टंट कोच रियान टेन डोशेटने म्हटले आहे. संजूने या स्पर्धेत एक सामना खेळला. त्यामध्ये त्याने ८ चेंडूत २२ धावा केल्या आणि त्याच सामन्यात भारताची सलामीची भागीदारी दुहेरी अंकी झाली. तो सामना नामिबियाविरुद्ध होता. या स्पर्धेतील बाकी सामन्यांमध्ये भारताची पहिली विकेट पहिल्याच षटकात पडल्याने एकेरीच भागीदारी झाली.
संजू उजव्या हाताचा फलंदाज असल्याने राईट-लेफ्ट कॉम्बिनेशन उत्तम ठरेल. जे भारतासाठी फायद्याचे ठरेल. भारताचा पुढील सुपर-८ सामना २६ फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध आहे. त्यासाठी जो संघ निवडला जाईल त्याचा भारताच्या स्पर्धेतील पुढील कामगिरीवर परिणाम होणार आहे. यामुळे संघ व्यवस्थापनाला नीट विचार करून सलामीला नेमके कोणाला आणावे हे निश्चित करावे लागेल.






