महिला क्रिकेटमध्ये आज (13 जुलै) ऐतिहासिक सामन्याचा निकाल लागला. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या एकमात्र कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने बाजी मारली आहे. भारताने चौथ्या दिवशी इंग्लंडचा 270 धावांनी मोठा पराभव केला. हा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवरील महिला संघांचा पहिलाच कसोटी सामना होता, ज्यामध्ये भारताने विजय मिळवला. त्याचबरोबर भारताला तब्बल 12 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी सामना जिंकण्यात यश आले आहे.
सुरूवातीपासून टीम इंडियाची सामन्यावर पकड
इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंटने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. भारताने स्म्रिती मंधानाच्या 83 धावा, कर्णधार हरमनप्रीत कौरच्या 58 धावा आणि दीप्ती शर्माच्या 57 धावांच्या जोरावर पहिल्या डावात 10 विकेट्स गमावत 285 धावसंख्या उभारली.
प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 170 धावसंख्येवर संपुष्टात आला. यामध्ये इंग्लंडकडून एकमेव अर्धशतकी खेळी ऍमी जोन्सने केली. तसेच ब्रंटसोबत पाचव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. त्यांची भागीदारी स्नेह राणाने तोडली. तिने जोन्सला 52 धावांवर बाद केले. त्याआधी इंग्लंडच्या फलंदाजी फळीला वेगवान गोलंदाजी क्रांती गौडने सुरुंग लावला.
क्रांतीने इंग्लंडच्या दोन्ही सलामी फलंदाजांना बाद करत पूर्ण डावात प्रभावी गोलंदाजी केली. तिने 17 षटकांत 37 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. क्रांती लॉर्ड्सवरील कसोटीमध्ये पाच विकेट्स घेणारी पहिली महिला गोलंदाज ठरली.
त्याचबरोबर भारताच्या इतर गोलंदाजांनी विकेट्स घेत क्रांतीला उत्तम साथ दिली. सायली सातघरे आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन तर दीप्तीने एक विकेट घेतली.
यास्तिका भाटियाचे ऐतिहासिक शतक
भारताने दुसऱ्या डावातही उत्तम फलंदाजीचे प्रदर्शन केले. मंधानाने शफाली वर्मासोबत पहिल्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली, मात्र शफाली 33 धावांवर बाद झाली. त्यानंतर मंधानाने विकेटकीपर-फलंदाज यास्तिका भाटियासोबत संघाचा धावफलक हलता ठेवला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली, मात्र मंधानाचे शतक हुकले. ती 70 धावा करत बाद झाली.
मंधानाचे शतक हुकले असले तरी या डावात भारताकडून पहिले शतक आले. भाटियाने 113 धावा केल्या आणि लॉर्ड्सवरील कसोटीमध्ये शतकी खेळी करणारी पहिली महिला क्रिकेटपटू होण्याचा विक्रम रचला. रिचा घोषनेही अर्धशतकी खेळी करत भारताची आघाडी आणखी भक्कम केली. दुसऱ्या डावात भारताने 7 विकेट्स गमावत 341 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला 457 धावसंख्येचे लक्ष्य मिळाले.
दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांची कमाल
भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावातही लक्षवेधी कामगिरी केली. त्यांचे सलामीवीर स्वस्तातच तंबूत परतले. क्रांतीने टॅमी ब्यूमोंट, जी तिच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत होती, तिला शून्य धावेवर बाद केले. या डावात इंग्लंडने 13.3 षटकातच 34 धावसंख्येवर पहिल्या चार विकेट्स गमावल्या.
यामध्ये राणाच्या स्पिनच्या जाळ्यात इंग्लिश फलंदाज अडकले. त्यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव 186 धावसंख्येवर संपला. राणाने 19.5 षटकांत 42 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच क्रांती, सायली आणि दीप्ती यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
भारताचा पहिला डाव: 285/10
इंग्लंडचा पहिला डाव: 170/10
भारताचा दुसरा डाव: 341/7
इंग्लंडचा दुसरा डाव: 186/10
क्रांती ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरली.
लॉर्ड्सवरील या कसोटी सामन्यातील रेकॉर्ड्स
1) महिला संघांचा हा या ग्राउंडवरील पहिलाच कसोटी सामना होता. लॉर्ड्सवर महिला कसोटी सामना खेळण्यास 142 वर्षांचा कालावधी लागला.
2) लॉर्ड्सवरील कसोटीमध्ये 5 विकेट्स घेण्याचा पहिली महिला होण्याचा विक्रम भारताच्या वेगवान गोलंदाज क्रांती गौडच्या नावावर. तिने इंग्लंडच्या पहिल्या डावात 17 षटकांत 37 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.
3) लॉर्ड्सवरील कसोटीमध्ये पहिली शतकवीर होण्याचा मान, भारतीय विकेटकीपर-फलंदाज यस्तिका भाटियाला. तिने भारताच्या दुसऱ्या डावात 113 धावांची खेळी केली आणि लॉर्ड्सवरील कसोटीमध्ये शतक करणाऱ्या खास यादीत प्रवेश केला. ती लॉर्ड्सवर शतक करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.
4) महिला क्रिकेटमध्ये लॉर्ड्सवर कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम भारताच्या नावावर नोंदवला गेला. हा महिला संघांचा पहिलाच कसोटी सामना असल्याने भारताने मिळवलेला विजय खास ठरला आहे.






