‘एक घाव अन् दोन तुकडे’ या म्हणीचा प्रत्यय भारतीय संघाने आज (१९ जानेवारी) सर्वांना दिला आहे. परंतु भारतीय संघाने एका घावामध्ये दोनपेक्षा जास्त तुकडे केले आहेत.
रिषभ पंत आणि शुबमन गिल यांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्णायक अशा चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ३ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने २-१ च्या फरकाने मालिकाही जिंकली. सोबतच तिसऱ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी पटकावली. या एका कसोटी विजयासह भारताने काही विश्वविक्रम मोडले आहेत.
ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विश्वविक्रम –
हा निर्णायक सामना जिंकत भारताने ऑस्ट्रेलियाची गेल्या ३ दशकातील ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याची मालिका खंडीत केली आहे. साल १९८८ पासून ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटी सामन्यात पराभव स्विकारलेला नव्हता. भारताविरुद्धच्या सामन्याआधी सन १९८८ नंतर ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन येथे खेळलेल्या ३१ सामन्यांपैकी २४ सामन्यांमध्ये विजय मिळवले असून ७ सामने अनिर्णित राहिले. नुकताच भारताविरुद्ध झालेला चौथा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेनमध्ये झालेला ३२ वा सामना होता.
ऑस्ट्रेलियाने या मैदानावर शेवटचा पराभव १९८८ साली वेस्ट इंडिजविरुद्ध स्विकारला होता. त्यावेळी वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला ९ विकेट्सने पराभूत केले होते.
तसेच आत्तापर्यंत ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या सामन्यांचा विचार करायचा झाल्यास त्यांनी या मैदानावर ६३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील ४० सामन्यात विजय मिळवला आहे. तर ८ सामन्यात पराभव स्विकारला होता. हे आठही सामने सन १९८८ च्या आधीचे आहेत. तसेच ब्रिस्बेन येथे झालेला १ सामना बरोबरीत सुटला आहे, तर १३ सामने अनिर्णित राहिले आहेत.
सलग १६ कसोटी सामने जिंकण्याचा विश्वविक्रम –
ऑस्ट्रेलिया संघाने १९९९ ते २००१ दरम्यान सलग १६ कसोटी सामने जिंकले होते. तर २००५ ते २००८ दरम्यान पुन्हा एकदा सलग १६ कसोटी सामने अपराजित राहण्याचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाने केला होता. यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक २ वेळा सलग १६ कसोटी सामने जिंकण्याचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. परंतु, त्यांचा हा विजयरथही दोन्ही वेळेस भारतानेच रोखला होता. सन २००१ ला भारताने कोलकाता कसोटीत विजय मिळवला होता तेव्हा आणि २००८ साली पर्थ येथे विजय मिळवत ही १६ विजयांची ऑस्ट्रेलियाची मालिका खंडीत केली होती.
सलग ९ कसोटी मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम-
ऑस्ट्रेलिया संघाने तब्बल १३ वर्षांपुर्वी सलग ९ कसोटी मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम नोंदवला होता. २००५ ते २००८ या कालावधीत ऑस्ट्रेलियाने सलग ९ कसोटी मालिका जिंकल्या होत्या. भारतीय संघदेखील २०१५ ते २०१८ दरम्यान सलग ९ कसोटी मालिका जिंकत या विश्वविक्रमात ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीवर आहे.
पर्थ आणि ब्रिस्बेनच्या मैदानावर जिंकणारा एकमेव संघ –
ऑस्ट्रेलिया संघ हा पर्थच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन स्टेडियम आणि ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर कसोटी सामना जिंकणारा आशिया खंडातील पहिला आणि एकमेव संघ होता. यापुर्वी भारतीय संघाने पर्थच्या मैदानावर २००८ मध्ये अनिल कुंबळे यांच्या नेतृत्त्वाखाली कसोटी सामना जिंकला होता. परंतु त्यांना ब्रिस्बेनमध्ये एकदाही कसोटी सामना जिंकता आला नव्हता. मात्र नुकतेच ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारत पर्थ आणि ब्रिस्बेनच्या मैदानावर कसोटी सामना जिंकणारा आशियाई संघ ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
केवळ आजी-माजी क्रिकेटपटूंनीच नाही तर इंग्लंडच्या या फुटबॉलपटूकडूनही टीम इंडियाला मिळाल्या शुभेच्छा
विलक्षण योगायोग! बाप विराटच्या आणि आता लेकीच्या जन्मावेळीही घडलाय तोच इतिहास; जाणून घ्या