इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा स्थगित झाल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान हा सामना इंग्लंडच्या साउथँप्टनमध्ये खेळवला जाणार आहे.
चितेंची बाब अशी की, भारतीय फलंदाजांना स्विंग होणारे चेंडू खेळणे कठीण जाते. तर न्यूझीलंड संघात चेंडू स्विंग करणारे जगप्रसिद्ध गोलंदाज आहेत. तसेच मुख्य बाब म्हणजे हा सामना इंग्लंडमध्ये असणार आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघाचे पारडे थोडे जड असू शकते. कारण विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांसारखे फलंदाज स्विंग होणाऱ्या चेंडूवर लवकर माघारी परततात. त्यामुळे भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये कुठले खेळाडू असतील? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
असा अंदाज लावला जात आहे की, भारतीय संघासाठी रोहित शर्मासह शुबमन गिल मैदानात सलामी फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उल्लेखनीय कामगिरी केली होती. परंतु भारतात झालेल्या इंग्लंड संघाविरुद्धच्या मालिकेत त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते.
शुबमन गिलची कामगिरी
गिलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघात पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने ७ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ३४.३६च्या सरासरीने ३७८ धावा केल्या आहेत. यात त्याने ३ अर्धशतक झळकावले आहे. तर २ वेळेस तो ० धावांवर माघारी परतला आहे. त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत उत्कृष्ट फलंदाजी करत २५९ धावा केल्या होत्या. यात त्याने मेलबर्नमध्ये ४५ आणि ३५ धावांची खेळी केली होती. तर ब्रिस्बेन कसोटी सामन्यात त्याने ७ आणि ९१ धावांची तुफानी खेळी केली होती.
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत आणि आयपीएल स्पर्धेत धावा करण्यात अपयश
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर त्याला इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु त्याला या संधी सोने करता आले नव्हते. त्याने या मालिकेतील ४ सामन्यात १९.८३ च्या सरासरीने अवघ्या ११९ धावा केल्या होत्या. तर आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील त्याला मोठ्या धावा करण्यात अपयश आले होते. आयपीएल २०२१ स्पर्धेत त्याने ७ सामन्यात अवघ्या १३२ धावा केल्या होत्या. यावरून स्पष्ट होत आहे की, तो चांगल्या फॉर्ममध्ये नाहीये.
शुबमन गिलला संधी मिळण्याची मुख्य कारणे
गेल्या २ मोठ्या स्पर्धेत त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले असले तरीही विराट कोहली शुबमन गिललाच संधी देऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे, गिल हवेत स्विंग होणाऱ्या चेंडूना चांगलाच खेळून काढतो. तसेच इंडिया एकडून खेळताना त्याने न्यूझीलंड दौऱ्यावर तुफान फटकेबाजी केली होती. त्याने ३ डावात २११ च्या सरासरीने ४२३ धावा चोपल्या होत्या. यात त्याने २ शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते. यात नाबाद २०४ ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. यावरून दिसून येते की, विराट कोहली शुबमन गिलला सलामी फलंदाजाची जबाबदारी देऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटच्या एका मेसेजची कमाल अन् हर्षल पटेल बनला आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज
भारताच्या श्रीलंका दौर्याला १३ जुलै रोजी होणार सुरवात, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक