मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने सामन्यावर चांगलीच पकड मिळवली आहे. पहिल्या डावात ३२५ धावा उभारल्यानंतर भारतीय संघाने न्यूझीलंडचा डाव ६२ धावांवर गुंडाळला. त्यानंतर दुसर्या डावात बिनबाद ६९ धावा भारतीय संघाने केल्या. भारताच्या पहिल्या डावात सर्वच्या सर्व दहा बळी घेणाऱ्या एजाज पटेल याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचवेळी भारतीय कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह भारतीय खेळाडूंनी न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन एजाजचे अभिनंदन केले.
एजाजने केली ऐतिहासिक कामगिरी
मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचे चार गडी बाद झाले होते. हे चारही गडी फिरकीपटू एजाज पटेलने टिपलेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील त्याने भारतीय संघाचे उर्वरित सहा गडी बाद करत सर्वच्या सर्व दहा गडी बाद करण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. यापूर्वी अशी कामगिरी इंग्लंडचे जिम लेकर व भारताच्या अनिल कुंबळे यांनी केली होती. विशेष म्हणजे एजाज हा जन्मता मुंबईकर असून, तो न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करतो.
विराट-द्रविड यांनी दाखवले मोठे मन
दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबल्यानंतर न्यूझीलंडचा संघ ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना भारतीय खेळाडूंनी एजाज पटेलचे अभिनंदन केले. सर्वप्रथम कर्णधार विराट कोहली याने त्याची भेट घेतली. त्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व वेगवान गोलंदाज मोहम्मद राज यांनी देखील जाऊन त्याची गळाभेट घेत कौतुक केले. ही छायाचित्रे सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत.
भारतीय संघ सामन्यात आघाडीवर
भारतीय संघ पहिल्या डावात ३२५ धावांवर सर्व बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा दुसरा डाव ढेपाळला. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत न्यूझीलंडला केवळ ६२ धावांवर रोखले. त्यानंतर भारतीय संघासाठी सलामी देताना दुसऱ्या डावात मयंक अगरवाल व चेतेश्वर पुजारा यांनी बिनबाद ६९ धावा केल्या आहेत. भारतीय संघाची आघाडी ३३२ धावांची झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
युगांडा पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिव्यांग खेळाडू आरती पाटीलचे यश
श्रेयस अय्यरने सावरली वृद्धिमान साहाची चूक, पाहा जेमिसनला कसे पाठवले तंबूत
निच्चांकी ६२ धावांनी झाली न्यूझीलंडची नाचक्की! अनेक लाजिरवाणे विक्रम नावावर