टीम इंडियाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने नुकतेच त्याच्या आवडत्या ऑलटाइम इंडिया प्लेइंग इलेव्हनची निवड केली होती. कार्तिकने सध्याच्या पाच क्रिकेटपटूंना संघात निवडले. पण त्यात माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीचा समावेश नव्हता. अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज धोनीला ऑल टाईम प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आल्याने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. परिणामी चाहत्यांनी कार्तिकवर जोरदार टीका केली. मात्र, 39 वर्षीय कार्तिकने आता आपली चूक सुधारली असून धोनीची निवड न केल्याबद्दल चाहत्यांची माफी मागितली आहे. असे करणे ही मोठी चूक असल्याचे तो म्हणाला.
क्रिकबझवर युजर्सच्या प्रश्नांची उत्तरे देताना कार्तिकने आपली चूक मान्य केली. तो म्हणाला, “बंधूंनो, माझ्याकडून खरचं खूप मोठी चूक झाली. व्हिडिओ समोर आल्यानंतर मला हे समजले. जेव्हा मी ही प्लेइंग इलेव्हन निवडली तेव्हा खूप गोष्टी घडल्या. मी खरोखरच यष्टीरक्षक (धोनी) विसरलो. सुदैवाने, राहुल द्रविड इलेव्हनचा भाग होता त्यामुळे प्रत्येकाला वाटले की मी अर्धवेळ यष्टीरक्षक निवडला आहे. पण मी राहुल द्रविडचा यष्टिरक्षक म्हणून विचार केला नव्हता.” धोनी निश्चितपणे इलेव्हनचा एक भाग आहे आणि कर्णधारपदही त्याच्याकडेच राहील, असंही तो म्हणाला.
पुढे कार्तिक म्हणाला, “तुम्ही यावर विश्वास ठेवू शकता का? यष्टिरक्षक असल्याने मीच यष्टिरक्षक निवडायला विसरलो. ही एक मोठी चूक आहे. एवढी मोठी चूक व्हायला नको होती. हे मला अगदी स्पष्ट आहे. थाला धोनी कोणत्याही फॉरमॅटसाठी पूर्णपणे फिट आहे.” कार्तिकने दावा केला, ””मला खरोखर विश्वास आहे की, “धोनी हा केवळ भारतीय नाही, तो हा खेळ खेळणाऱ्या महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
तो पुढे म्हणाला, “जर मी पुन्हा संघ बनवला तर मी एक बदल नक्कीच करेन. थाला धोनी 7 व्या क्रमांकावर असेल आणि तो कोणत्याही भारतीय संघाचा कर्णधार असेल. यात शंका नाही.” कार्तिकने आपल्या ऑल टाइम इंडिया इलेव्हनमध्ये सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवागची निवड केली होती. त्याने राहुल द्रविडला तिसऱ्या स्थानावर आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरला चौथ्या स्थानावर ठेवले. त्याच्यानंतर विराट कोहली. युवराज सिंग आणि रवींद्र जडेजा यांची अष्टपैलू म्हणून निवड करण्यात आली. यानंतर रविचंद्रन अश्विन आणि अनिल कुंबळे हे दोन फिरकी गोलंदाज आणि जसप्रीत बुमराह आणि झहीर खान हे दोन वेगवान गोलंदाज होते.
हेही वाचा-
पाकिस्तानच्या फलंदाजानं मोडला रिषभ पंतचा मोठा विक्रम! शतक झळकावून गाठला खास टप्पा
कॅप्टन रोहित बार्बाडोसनंतर आता पाकिस्तानात फडकावेल तिरंगा! जय शहांची भविष्यवाणी
बॉर्डर गावसकर ट्रॉफीत रोहित-विराट नव्हे तर ‘हा’ खेळाडू ठरेल मॅच विनर, ऑसी दिग्गजाचा विश्वास