---Advertisement---

त्रिनिदाद कसोटीवर भारतीय संघाची मजबूत पकड! चौथा दिवस रोहित-किशनच्या नावे

On: सोमवार, जुलै 24, 2023 8:40 AM
---Advertisement---

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्या दरम्यान सुरू असलेल्या त्रिनिदाद येथील दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. चौथ्या दिवशी भारतीय संघाच्या गोलंदाजांनी व फलंदाजांनी शानदार कामगिरी करत, यजमान संघाला बॅकफुटवर ढकलले. पहिल्या डावात मिळालेल्या 183 धावांच्या आघाडीनंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात आणखी 181 धावा करत वेस्ट इंडिज संघासमोर विजयासाठी 365 धावांचे आव्हान ठेवले. त्याचा पाठलाग करताना यजमान संघाने दोन बाद 76 अशी मजल मारली आहे.

मोहम्मद सिराज याने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला यजमान संघ केवळ 26 धावांची भर घालून तंबूत परतला. वेस्ट इंडीज 255 धावांवर सर्वबाद झाल्याने भारतीय संघाला 183 धावांची आघाडी मिळाली. ही आघाडी घेऊन दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा व यशस्वी जयस्वाल यांनी  98 धावांची सलामी दिली. रोहितने 44 चेंडूंवर 5 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 57 धावांची आक्रमक खेळी केली.

पावसाच्या व्यत्ययामुळे लंचनंतर खेळ काहीसा उशिरा सुरू झाल्यानंतर यशस्वी जयस्वाल 39 धावा करून तंबूत परतला. मात्र, चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या ईशान किशन याने 33 चेंडूंवर तुफानी अर्धशतक ठोकले. त्याच्या अर्धशतकानंतर रोहितने भारतीय संघाचा डाव घोषित केला.

विजयासाठी 365 धावांचे मोठे आव्हान मिळाल्यानंतर, वेस्ट इंडिजला कर्णधार ब्रेथवेट व चंद्रपॉल यांनी 38 धावांची सलामी दिली. मात्र, अश्विन याने एकाच षटकात ब्रेथवेट व मॅकेन्सी यांना बाद करत भारतीय संघाला पुनरागमन करून दिले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडीज संघाने दोन बाद 76 धावा केल्या असून, अखेरच्या दिवशी त्यांच्यापुढे सामना वाचवण्याचे आव्हान असेल.
(Team India Dominate Trinidad Test Rohit Ishan Hits Fast Fifties)

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---