भारतीय क्रिकेट संघात जागा मिळण्यासाठी सध्या प्रचंड स्पर्धा आहे. कारण देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आणि आयपीएलमुळे भारतीय क्रिकेटमध्ये बरेच युवा प्रतिभाशाली क्रिकेटपटू तयार होत आहेत. या क्रिकेट स्पर्धांमध्ये धुव्वादार प्रदर्शन करत हे खेळाडू भारतीय संघाचे दरवाजे खटखटत आहेत. सध्या भारतीय संघामध्ये निश्चित सलामी जोडी आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत केएल राहुल हा सलामीला चांगले प्रदर्शन करतो आहे. त्याच्या अनुपस्थित मयंक अगरवालचा पर्यायही संघाकडे उपलब्ध आहे.
मात्र भविष्यात या २ सलामीवीरांनंतर भारतीय संघाला नव्या सलामीवीराची आवश्यकता असेल. अशात काही युवा खेळाडू आहेत, जे भविष्यात भारतीय संघाकडून सलामीच्या स्थानावर आपला दावा ठोकू शकतात. अशाच ५ सलामीवीरांबद्दल आपण या बातमीतून माहिती घेणार आहोत.
हेही वाचा- असे ३ फलंदाज, ज्यांनी आयपीएलमध्ये घातक वेगवान गोलंदाज बुमराहची केलीय धू धू धुलाई
पाच फलंदाज, जे भविष्यात भारतीय संघाकडून देऊ शकतात सलामी (Team India’s Future 5 Opening Batsman)
१. इशान किशन (Ishan Kishan)
भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज इशान किशन त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तसेच तो चांगले यष्टीरक्षणही करू शकतो. आयपीएलमध्येही तो रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. त्याने बऱ्याचदा रोहितसोबत मुंबई संघाकडून सलामी दिली आहे आणि चांगले प्रदर्शनही केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्येही रोहितने इशानला सलामीला फलंदाजीची संधी दिली होती. त्याच्यात कोणत्याही परिस्थितीत सामन्याचा कायापालट करण्याची क्षमता आहे. तसेच डाव्या-उजव्या कॉम्बिनेशनमुळेही कर्णधार रोहित त्याला सलामीला संधी देण्यास प्राधान्य देऊ शकतो. अशात इशानकडे भारतीय संघाचा भावी सलामीवीर म्हणून पाहिले जाऊ शकते.
२. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)
भारतीय संघाला २०१८ साली आयसीसीचा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार आणि घातक फलंदाज पृथ्वी शॉ हादेखील एक दमदार सलामीवीर आहे. त्याच्यामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवाग यांचे कॉम्बिनेशन दिसते. तो रोहितप्रमाणे सलामीला फलंदाजीला येत निर्भीड फटकेबाजी करण्यातही माहिर आहे. त्याने आतापर्यंत भारतीय संघाकडून ५ कसोटी सामने खेळताना ३३९ धावा, ६ वनडे सामने १८९ धावा केल्या आहेत. त्यामुळे पृथ्वी शॉला येणाऱ्या काळातील भारतीय संघाचा उमदा सलामीवीर म्हणणे वावगे ठरणार नाही.
३. रिषभ पंत (Rishabh Pant)
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने त्याच्या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर काही दिवसांतच भारतीय संघातील आपले स्थान पक्के केले आहे. तो डाव्या हाताने फलंदाजी करतो आणि सलामीला उतरल्यास विस्फोटक फलंदाजी करत विरोधी संघांचा चांगलाच घामही काढू शकतो. तो सलामीला फलंदाजी करण्याबरोबरच यष्टीरक्षणातही महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. नुकतेच त्याने कसोटी क्रिकेटमध्येही सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याची किमया साधली आहे. त्यामुळे त्याच्याकडे भारतीय संघाचा भावी सलामीवीर म्हणून पाहणे चुकीचे ठरणार नाही.
४. शुबमन गिल (Shubman Gill)
शुबमन गिलने आयसीसीच्या १९ वर्षांखालील विश्वचषक २०१८ मध्ये भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेत वरिष्ठ भारतीय संघाकडूनही सलामीला फलंदाजी करताना त्याने अनेक मॅच विनिंग खेळी केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मासोबत सलामीला फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधून शानदार खेळी निघाल्या आहेत. त्याने भारताकडून केवळ १० कसोटी सामने खेळताना ५५८ धावा केल्या आहेत. येत्या काळात तो पुन्हा एकदा भारतीय संघाकडून सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतो.
५. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)
भारतीय संघाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड गेल्या काही वर्षांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीला फलंदाजी करताना सर्वाधिक धावा केल्या होत्या. असे असले तरीही, त्याला भारतीय संघाकडून खेळण्याच्या जास्त संधी मिळालेल्या नाहीत. आणि मिळालेल्या संधींमध्ये त्याला आपल्या प्रदर्शनाची चमक दाखवता आलेली नाही. मात्र त्याला सातत्याने सलामीला संधी मिळाल्यास तो रोहित शर्मासोबत मिळून संघाला जबरदस्त सुरुवात करून देऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजची खेळाडू मैदानावरच कोसळली; तातडीने हलवले रुग्णालयात
‘काही नवे, तर काही जुने’, सनरायझर्स संघात तीन महत्त्वाच्या सदस्यांचं झालं जंगी स्वागत
असे ३ फलंदाज, ज्यांनी आयपीएलमध्ये घातक वेगवान गोलंदाज बुमराहची केलीय धू धू धुलाई