अंडर-19 विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) दोन्ही संघात सामना खेळवला जात आहे. सेमीफायनलच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा होता. पण हा सामना संपण्यापूर्वीच भारताने अंडर-19 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. बुलवायोच्या क्वीन्सस्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवल्या जात असलेल्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं आणि संघाने 252 धावांचं मोठं लक्ष्य दिलं. पण सामन्याचा निकाल लागण्याआधी भारत कसा क्वालिफाय झाला?
ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान हे दोन्ही संघ अ गटातून तर इंग्लंडचा संघ ब गटातून सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे. भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये सेमीफायनल सामन्यासाठी लढत होती. पण 33.3 षटके होताच पाकिस्तान भारताने दिलेलं लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला आणि भारताने सेमीफायनल गाठली.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 252 धावांचा डोंगर उभारला. आरोन जॉर्ज व वैभव सूर्यवंशी यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. आरोन 16 धावा तर वैभव (Vaibhav Suryavanshi) 30 धावा करत बाद झाला. भारताने झटपट 3 विकेट्स गमावल्या. यानंतर वेदांत त्रिवेदी व विहान मल्होत्रा यांनी 62 धावांची भागीदारी रचली. वेदांतने तर 98 चेंडूत 2 चौकार व एका षटकारासह 68 धावांची खेळी केली.यानंतर खालच्या फळीत अंबरीश, कनिष्क चौहान व खिलान पटेल यांनी महत्त्वपूर्ण धावा जोडल्या आणि संघाने 250 चा आकडा पार केला.
उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला फक्त 33.3 षटकांत 253 धावांचे लक्ष्य गाठणं आवश्यक होतं, जेणेकरून त्यांचा नेट रन रेट भारतापेक्षा चांगला होऊ शकेल. पण या दबावपूर्ण सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी त्या पातळीपर्यंत पोहोचू शकली नाही आणि संघ निर्धारित वेळेत लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला. पाकिस्तानने 33.3 षटकांत 165 धावाच करू शकला.
बुलावायोच्या खेळपट्टीवर धावा करणं शक्य नव्हतं. पाकिस्तानने सुरूवात चांगली केली, पण संघाने फलंदाजी करताना एकदाही निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी खेळताना दिसले नाहीत. परिणामी भारताच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत पाकिस्तानच्या धावांना ब्रेक लावला.






