संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होत असलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाला सलग दोन मानहानीकारक पराभव स्वीकारावे लागले. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या या पराभवामुळे भारतीय संघाचा उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा मावळल्या आहेत. भारताच्या नामुष्कीजनक पराभवला अनेक चाहते आयपीएलला जबाबदार धरत आहेत. आज आपण भारतीय संघाच्या पराभवास जबाबदार असलेल्या आयपीएल संबंधित तीन कारणांबद्दल जाणून घेऊया.
खेळाडूंचा थकवा
विश्वचषक सुरु होण्यापूर्वी भारतीय संघातील सर्व खेळाडू जवळपास महिनाभर आयपीएलच्या उत्तरार्धात कमीत कमी ७ सामने खेळले. याचा फायदा भारतीय संघाला विश्वचषकात होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, याचमुळे भारतीय खेळाडूंना थकवा आला असल्याचे बोलले जात आहे. तसेच, सातत्याने बायो-बबलमध्ये राहिल्याने खेळाडूंना मानसिक तणावाला देखील सामोरे जावे लागत आहे.
इतर देशांचे खेळाडू करतात अभ्यास
टी२० विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघातील सर्व खेळाडू आयपीएलमध्ये वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी खेळले. आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंसोबत खेळल्यामुळे, इतर देशांतील खेळाडूंना भारताच्या मुख्य खेळाडूंविरुद्ध रणनीती आखण्याची संधी मिळते आणि याचा फायदा त्यांना तसेच त्यांच्या संपूर्ण संघाला होतो. ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सँटनर ही त्याची ताजी उदाहरणे आहेत. रविवारी भारताविरुद्ध या दोघांनी चमकदार कामगिरी केली. याशिवाय दुसरे कारण म्हणजे बीसीसीआय आपल्या खेळाडूंना इतर देशांच्या क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची संधी देत नाही. यामुळे त्यांना इतर संघातील मोठ्या खेळाडूंविरुद्ध तयारी करण्याची संधी मिळत नाही.
आयपीएलने मिळतो पैसा आणि प्रसिद्धी
आयपीएल ही जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीग आहे. आयपीएलसाठी काही देशातील क्रिकेटपटू त्यांच्या राष्ट्रीय संघातून खेळण्याची ऑफरही नाकारतात. भारतातील प्रत्येक युवा क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून आयपीएलमध्ये प्रवेश मिळवण्याचा विचार करतो. आयपीएलमध्ये खेळून भारतीय तरुणांना चांगला पैसा आणि प्रसिद्धी मिळाली की, अचानक देशासाठी खेळण्याची जिद्द आणि उमेद कमी होते. अशा परिस्थितीत हे युवा क्रिकेटपटू देशासाठी खेळतात तेव्हा त्यांच्या कामगिरीत घसरण होते.
महत्त्वाच्या बातम्या-
स्तुत्य उपक्रम! पाकिस्तानच्या प्रत्येक विजयाचा होणार देशातील विद्यार्थ्यांना फायदा; वाचा सविस्तर
भारताचे असे ६ खेळाडू ज्यांच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीची सुरुवात टी२० विश्वचषकातून झाली