कमी उंचीचा पण आपल्या चेंडूच्या वेगाने भल्याभल्या फलंदाजांना घाम आणणारा गोलंदाज. १९८७ सालच्या विश्वचषकात त्यांनी हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला होता. अशी कामगिरी केली असूनही एका सामन्यानंतर त्यांना आपल्याच देशात तोंड लपवून फिरावे लागले होते. पण आज तेच गोलंदाज भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता बनले आहेत. हे गोलंदाज म्हणजे, माजी भारतीय क्रिकेटपटू चेतन शर्मा होय. भारताकडून २३ कसोटी आणि ६५ वनडे सामने खेळणारे चेतन शर्मा फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेवेळी भारतीय संघाची निवड करणार आहेत. आज(३ डिसेंबर) याच चेतन शर्मा यांचा ५६ वा वाढदिवस आहे.
चेतन शर्मा यांना त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. मेहनत, प्रसिद्धी, अचानक आलेली संकटे, लोकांच्या टिकेचा सामना अशा अनेक गोष्टींनी भरलेली चेतन शर्मा यांची कारकिर्द कोणत्या बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी राहिलेली नाही. चला तर जाणून घेऊया, चेतन शर्मा यांच्या कारकिर्दीतील काही रोमांचक गोष्टी-
१७व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केले पदार्पण
उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांचा जन्म ३ जानेवारी १९६६ साली पंजाबच्या लुधियाना शहरात झाला होता. त्यांची उंची काही खास नसतानाही आपल्या गोलंदाजी वेगाने ते मोठमोठ्या दिग्गजांना रडकुंडीला आणून सोडत होते. चंदीगडचे प्रसिद्ध प्रशिक्षक देश प्रेम आझाद यांच्याकडून त्यांनी क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले होते. आझाद यांनी कपिल देव तसेच योगराज सिंग यांनाही मार्गदर्शन केले होते.
चेतन शर्मा यांच्यात इतकी प्रतिभा होती की, त्यावेळी वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. डिसेंबर १९८३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी पहिला वनडे आणि १९८४ साली पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता.
आपल्याच देशात वेगळ्या वेशात फिरण्याची आली होती वेळ
चेतन शर्मा हे प्रतिभावंत गोलंदाज होते. मात्र १९८६ साली त्यांच्या कारकिर्दीत अशी घटना घडली होती की, त्यांना आपल्याच देशात वेगळा वेश धारण करून फिरावे लागले होते. १९८६ साली शारजाह येथील ऑस्ट्रल-आशिया चषक अंतिम सामन्यात पाकिस्तानचे फलंदाज जावेद मियाँदाद यांनी सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारत सामना जिंकला होता. यावेळी चेतन शर्मा गोलंदाजी करत होते. त्यांच्या गोलंदाजीमुळे भारताला सामना गमवावा लागला होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट रसिकांच्या नजरेत ते खलनायक बनले. त्यामुळे त्यांना सामन्यानंतर बाहेर फिरताना वेगळा वेश करून फिरावे लागले होते.
असे असले तरी, पुढील इंग्लंड दौऱ्यावर त्यांची निवड झाली होती. यावेळी त्यांनी भारताला कसोटी मालिका जिंकवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते. लॉर्ड्स येथे झालेल्या एका सामन्यात त्यांनी पहिल्या डावात ६४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर त्याचवर्षात त्यांनी बर्मिंगहम येथील कसोटीत १० विकेट्स घेतल्या होत्या. तो उन्हाळी हंगाम त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला होता. त्यांनी या हंगामात एकूण १६ विकेट्स घेतल्या होत्या.
विश्वचषकात हॅट्रिक घेणारे ठरले पहिले क्रिकटपटू
नागपूर येथील १९८७ सालच्या विश्वचषकात चेतन यांनी कारकिर्दीतील पहिली हॅट्रिक घेतली होती. ही हॅट्रिक त्यांनी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील सामन्यात घेतली होती. न्यूझीलंडचे फलंदाज केन रूदरफोर्ड, आयन स्मिथ आणि इव्हेन चॅटफिल्ड यांच्या सलग ३ विकेट्स घेत पहिली हॅट्रीक नोंदवली होती. त्यावेळी ते विश्वचषकात हॅट्रिक घेणारे जगातील पहिले गोलंदाज होते.
इंग्लंडविरुद्ध ठोकले होते शतक
एवढेच नव्हे तर, गोलंदाजीत चमकदार कामगिरी करणाऱ्या चेतन शर्मा यांनी फलंदाजीतही विक्रमी खेळी केली होती. १९८९ साली इंग्लंडविरुद्धच्या नेहरू चषक त्यांनी ताबडतोब शतक लगावले होते. या स्पर्धेतील वनडे सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत ९६ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या होत्या. त्यांच्या या अफलातून खेळीमुळे भारतीय संघाने ६ विकेट्सने तो सामना जिंकला होता.
चेतन शर्मा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी
चेतन शर्मा हे प्रतिभावंत खेळाडू होते, तरीही त्यांची कसोटी क्रिकेट कारकिर्द खूप लवकर संपली. १९८९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी शेवटचा कसोटी सामना खेळला. त्यावेळी ते फक्त २३ वर्षांचे होते. त्यानंतर १९९४ साली वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी शेवटचा वनडे सामना खेळला. हा त्यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.
तत्पुर्वी त्यांनी ६५ वनडे सामने खेळत ६७ विकेट्स घेतल्या होत्या. दरम्यान त्यांनी २२ धावांवर ३ विकेट्स घेण्याची सर्वोत्तम कामगिरी केली होती. तसेच २३ कसोटी सामन्यात ६१ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
टीकेचा धनी ठरलेल्या रूटची ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केली पाठराखण; म्हणाला…
दुसऱ्या कसोटीपूर्वी द्रविडने रहाणे-पुजाराच्या फॉर्मविषयी दिली महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया; म्हणाला…
विराट माध्यमांसमोर कधी येणार ? प्रशिक्षक द्रविड यांनी दिले ‘हे’ उत्तर