---Advertisement---

‘किवी’ पुन्हा नडले! न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी स्पर्धेत विजयाची प्रतिक्षा लांबली, भारताचा १८ वर्षांतील ७ वा पराभव

---Advertisement---

दुबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी (३१ ऑक्टोबर) टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील सुपर १२ फेरीत सामना झाला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने ८ विकेट्सने विजय मिळवला. या विजयाने पुन्हा एकदा न्यूझीलंडचे आयसीसी स्पर्धेतील भारतीय संघावरील वर्चस्व दिसून आले.

भारताची न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाची प्रतिक्षा कायम
भारतासाठी गेल्या काही वर्षात आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंड संघ मोठा अडथळा ठरत आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन आयसीसी स्पर्धांचा विचार केल्यास भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाची मोठी किंमत मोजावी लागली आहे. भारताला टी२० विश्वचषक २०२१ पूर्वी २०२१ च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आणि २०१९ वनडे विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

विशेष म्हणजे भारतीय संघ २००३ नंतर आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवूच शकलेला नाही. २००३ नंतर भारताला २००७ साली टी२० विश्वचषकात, २०१६ साली टी२० विश्वचषकात, २०१९ वनडे विश्वचषकात, २०१९-२१ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या साखळी फेरीत (२ कसोटी सामन्यांच्या मालिकेत) आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. आणि आता २०२१ च्या टी२० विश्वचषकात देखील भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.

म्हणजेच भारतीय संघ २००३ नंतर आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध ७ सामन्यांत पराभूत झाला आहे. त्यामुळे भारताची न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी स्पर्धेतील विजयाची प्रतिक्षा २००३ पासून कायम आहे.

भारतासमोरील अडचणीत वाढ
भारताला रविवारी न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला असल्याने आता भारताचा टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील पुढील प्रवास खडतर झाला आहे. कारण यापूर्वी भारताने या स्पर्धेत पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध १० विकेट्सने पराभव स्वीकारला होता. त्यामुळे अजून तरी भारताचे गुणांचे खाते उघडलेले नाही.

दुसरीकडे भारताचा सुपर १२ फेरीत ज्या गटात समावेश आहे, त्या दुसऱ्या गटातील अन्य ४ संघांनी विजयाचे खाते उघडलेले आहे. यात पाकिस्तान संघ सलग ३ विजयांसह आघाडीवर असून त्यांनी उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के केले आहे. तसेच अफगाणिस्तानने पहिल्या ३ सामन्यांपैकी २ सामने जिंकले आहेत. तर, न्यूझीलंड आणि नामिबियाने पहिल्या २ सामन्यांपैकी १ सामना जिंकला असून १ सामना पराभूत झाले आहेत.

असे असतानाच भारत आणि स्कॉटलंड हे दोन असे संघ आहेत, त्यांच्या खात्यात अद्याप एकही विजय नाही. त्याचमुळे भारतासाठी पुढील सर्व सामने महत्त्वाचे तर आहेतच, पण भारताला अन्य संघांच्या निकालावरही आता अवलंबून राहावे लागणार आहे.

भारताचा पराभव 
रविवारी भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद ११० धावा केल्या होत्या. त्यानंतर १११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग न्यूझीलंडने १४.३ षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केला आणि सामना जिंकला.

आता भारताचा पुढील सामना ३ नोव्हेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. तर, न्यूझीलंडचा पुढील सामना ३ नोव्हेंबर रोजीच स्कॉटलंड विरुद्ध होईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

न्यूझीलंडने दुसऱ्यांदा केली टीम इंडियाची नाचक्की; टी२० विश्वचषकातील…

दुष्काळात तेरावा महिना! बांगलादेशला मोठा धक्का, टी२० विश्वचषकातून शाकिब अल हसन बाहेर

विराटचे सोढीपुढे पुन्हा लोटांगण! टी२० मध्ये ‘इतक्यांदा’ फसवले जाळ्यात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---