भारताचा वेगवान गोलंदाज चेतन सकारियानं मेघना जामबूचासोबत लग्नगाठ बांधली आहे. वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटनं ही माहिती दिली. उनाडकटनं या जोडप्याच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो स्वतःही दिसत आहे. चेतन सकारियाचा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये साखरपुडा झाला होता. त्यानंतर आता त्यानं जुलैमध्ये लग्न केलं. उनाडकटनं सकारियाला त्याच्या नवीन इनिंगसाठी अभिनंदन केलं आहे. हा तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि सर्वात महत्वाचे स्पेल असल्याचं उनाडकट म्हणाला.
जयदेव उनाडकटनं त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, “प्रिय चेतन, तुझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मी तुला काही उत्कृष्ट स्पेल टाकताना आणि सामने जिंकवताना पाहिलं आहे. परंतु हा निश्चितच तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा स्पेल असेल! मी तुम्हा दोघांच्या सुखी आयुष्यासाठी कामना करतो.” चेतन सकारियाचा 5 डिसेंबर 2023 रोजी मेघना जामबूचासोबत साखरपुडा झाला होता. तेव्हा त्यानं स्वतः फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
View this post on Instagram
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर चेतन सकारियानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळला. 26 वर्षीय चेतन सकारियाला 2021 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर पदार्पण करण्याची संधी मिळाली. मात्र तो भारतासाठी आतापर्यंत केवळ एकच एकदिवसीय आणि दोन टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. एका एकदिवसीय सामन्यात त्यानं 2 विकेट्स घेतल्या, तर 2 टी20 सामन्यात त्याला फक्त एक विकेट मिळाली.
सकारिया दुखापतीमुळे बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे. आयपीएल 2024 मध्ये तो एकही सामना खेळू शकला नाही. दुखापतीमुळे तो गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या दुलीप ट्रॉफीमध्येही खेळू शकला नाही. सकारिया जर दुखापतींपासून दूर राहिला, तर तो एक यशस्वी वेगवान गोलंदाज होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
‘माफी मागा…’, युवराज-हरभजन-रैनाला भारी पडू शकतो विचित्र डान्स; पॅरालिम्पिक समितीचा आक्षेप
डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार का? निवडकर्त्यांनी घेतला मोठा निर्णय
भारतानं ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा भाग कधी घेतला होता? पहिलं पदक कधी जिंकलं? संपूर्ण इतिहास जाणून घ्या