भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने ११ जानेवारीला त्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याची गोड बातमी दिली. अनुष्का प्रेगनंट असल्यामुळे विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतणे पसंत केले होते. याबरोबर विराट कोहली भारतीय संघातील त्या सदस्यांमध्ये सामील झाला आहे, ज्यांना केवळ एक मुलगी किंवा मुली आहेत परंतू मुलगा नाही. आत्तापर्यंत असे अनेक भारतीय क्रिकेटपटू आहेत, ज्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे.
विशेष म्हणजे अनेकदा हे क्रिकेटपटू त्यांच्या मुलींबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. तसेच त्यांना त्यांच्या मुली किती प्रिय आहेत, हे देखील सांगत असतात. विशेष म्हणजे यातील अनेक क्रिकेटपटू अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहभागी आहेत, त्यामुळे अप्रत्यक्षपणे का होईना पण पुरुष प्रधान मानल्या जाणाऱ्या भारतात कन्या जन्माचेही स्वागत करायलाच हवे, हा संदेश त्यांनी दिला आहे.
आजपर्यंत अनेक ड्रीम11 संघ बनलेले तुम्ही पाहिले असतील. पण केवळ कन्यारत्न प्राप्त झालेल्या भारतीय क्रिकेटपटूंची ड्रीम11 पाहिली आहे का? चला तर मंडळी अशाच खेळाडूंना घेऊन आपण एक खास टीम बनवुयात…
1 – रोहित शर्मा – भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने स्पोर्ट्स मॅनेजर असणाऱ्या रितिका सजदेह बरोबर 2015 मध्ये लग्न केले. त्यांना 30 डिसेंबर 2018 रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव या जोडप्याने समायरा असे ठेवले. समायरा 2019 च्या आयपीएलदरम्यान रोहित कर्णधार असलेल्या मुंबई इंडियन्सच्या अनेक सामन्यांना रितिकाबरोबर उपस्थित होती. तसेच ती 2020 आयपीएल हंगामादरम्यान देखील दुबईला गेली होती. गमतीचा भाग म्हणजे रोहितने बॅचलर, पती व पिता म्हणून आयपीएल जिंकली आहे.

2. गौतम गंभीर – दोनवर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेत राजकारणात प्रवेश केलेल्या गंभीरने नताशा जैनबरोबर 2011 मध्ये लग्न केले. त्यांना दोन मुली असून मोठ्या मुलीचे नाव अझीन आहे तर छोट्या मुलीचे नाव अनायझा असे आहे. तो अनेकदा त्याच्या मुलींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

3. चेतेश्वर पुजारा – भारताचा ‘टेस्ट स्पेशालिस्ट’ चेतेश्वर पुजाराला एक मुलगी आहे. त्याने पुजा पाबरीबरोबर फेब्रुवारी २०१३ला लग्न केले असून या दोघांना २२ फेब्रुवारी २०१८ ला मुलगी झाली. तिचे नाव त्यांनी आदिती असे ठेवले आहे. ती २०२०मध्ये विशाखापट्टणमला पार पडलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यासाठी पुजाबरोबर स्टेडियममध्ये उपस्थित होती. तसेच ती नुकत्याच चालू असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यानही पुजासह स्टेडियममध्ये उपस्थित होती.

4. विराट कोहली – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर २०१८मध्ये लग्न केले. त्यानंतर त्यांनी २०२०मध्ये अनुष्का गरोदर असल्याची घोषणा केली होती. ११ जानेवारी २०२१ रोजी विराटने ट्विटरच्या माध्यमातून त्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याची गोड बातमी दिली. विशेष म्हणजे विराट त्यांच्या बाळाच्या जन्मासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन लवकर मायदेशी परतला होता. त्याने पालकत्व रजा घेतली आहे.

5. अजिंक्य रहाणे – कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला 5 ऑक्टोबर 2019 रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. त्याने तिचे नाव आर्या ठेवले आहे. रहाणेने त्याची बालमैत्रीण राधिका धोपवकरबरोबर 26 सप्टेंबर 2014 रोजी लग्न केले होते. रहाणेला जेव्हा मुलगी झाली तेव्हा तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे कसोटी सामना खेळत होता. तो कसोटी सामना संपल्यानंतर तो त्याच्या मुलीला पाहण्यासाठी घरी गेला होता. त्यानंतर लगेचच तो भारतीय संघात परतला आणि त्याने पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळला होता.
रहाणे देखील अनेकदा त्याच्या मुलीबरोबरच गोंडस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.

6. एमएस धोनी – भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने 4 जूलै 2010 रोजी साक्षी रावतबरोबर लग्न केले होते. साक्षीने 6 फेब्रुवारी 2015 ला एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्या जन्मावेळी धोनी 2015 च्या विश्वचषकामध्ये व्यस्त होता. त्यामुळे तो जवळजवळ 2 महिने त्याच्या नवजात मुलीला भेटला नव्हता.
त्याच्या मुलीचे नाव झीवा असून तिचे इस्टाग्रामवर अकाउंटही आहे. या अकाउंटला हजारो फॉलोवर्स आहेत. झीवा अनेकदा आयपीएलवेळी साक्षीसह धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकतीच ती धोनीसह एका बिस्किटच्या ब्रँडच्या जाहीरातीतही झळकली आहे.

7. केदार जाधव – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधव आणि त्याची पत्नी स्नेहल जाधवला एक मुलगी असून तिचे नाव मिरया आहे. केदार अनेकदा त्याच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

8 – रविंद्र जडेजा – भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने रिवा सोळंकीबरोबर एप्रिल 2016मध्ये लग्न केले. या पती-पत्नीला 8 जून 2017 मध्ये कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव जडेजाने निध्याना असे ठेवले आहे.
तिच्या जन्मावेळी जडेजा 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये व्यस्त होता. या स्पर्धेनंतर भारतीय संघाबरोबर तो थेट इंग्लंडहून वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी गेल्याने त्याने त्याच्या मुलीला जवळजवळ 1 महिन्याने पहिल्यांदा पाहिले होते.

9. आर अश्विन – भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनला दोन मुली आहेत. अश्विनने त्याची बालमैत्रीण प्रीती नारायणबरोबर 13 नोव्हेंबर 2011रोजी लग्न केले. या उभयांतांना 11 जूलै 2015 ला पहिली मुलगी झाली. तर डिसेंबर 2016 ला प्रीतीने त्यांच्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला. त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव अकिरा असून लहान मुलीचे नाव आध्या आहे.

10. उमेश यादव- भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने २९ मे २०१३ रोजी विवाह केला. त्याच्या पत्नीचे नाव तान्या वाधवा असे आहे. उमेश भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. १ जानेवारी २०२१ रोजी तान्याने एका गोंडस मुलीला जन्म दिला. उमेश ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना त्याला ही गोड बातमी समजली परंतू तो दुखापतग्रस्त झाल्यामुळे आता त्याला भारतात परतावे लागले. त्यामुळे तो लवकरच आपल्या मुलीचा चेहरा पाहणार आहे. 
11. मोहम्मद शमी – भारताचा वेगवान गोलंदाज शमीला आयरा नावाची लहान मुलगी आहे. तो अनेकदा तिचे डान्स करतानाचे, खेळतानाचे अनेक व्हिडिओ तसेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याने त्याच्या मुलीचे नाव आयरा असे ठेवले आहे.

वाचा –
–३ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ज्यांनी केले आहे महिला क्रिकेटरशी लग्न
–१० भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी व त्या करत असलेलं काम
–घटस्फोटीत महिलांशी लग्न करणारे ५ भारतीय क्रिकेटर्स
–दोन वेळा लग्न केलेले १२ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, ५ नावे आहेत भारतीय






