यजमान भारत त्यांचा आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६चा दुसरा सामना गुरूवारी (१२ फेब्रुवारी) खेळणार आहे. नामिबियाविरुद्धचा हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी चांगलाच सराव केला आहे. अभिषेक शर्माला रुग्णालयात भरती केल्याने तो या सरावाच्या सेशनमध्ये नव्हता. तो नामिबियाविरुद्ध खेळणार की नाही याबाबत शंका आहे.
भारतीय संघासाठी एक चांगली बातमी म्हणजे दोन खेळाडू पूर्णपणे फिट होऊन संघात परतले आहे. यूएसएविरुद्धच्या सामन्यात अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळला नव्हता. त्याची तब्येत खराब होती, यामुळे तो भारताच्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्याला मुकला. आता तो ठीक असून त्याने सरावही केला. तसेच वॉशिंग्टन सुंदर देखील नेटमध्ये सराव करताना दिसला.
अभिषेकला पोटाचा संसर्ग झाल्याने दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे तो गुरूवारी खेळणार की नाही याबाबत शंका आहे. त्याच्यासाठी टी२० विश्वचषक पदार्पण निराशाजनक राहिले. तो यूएसएविरुद्ध शून्यावरच बाद झाला. त्या सामन्यापासूनच त्याची तब्येत खराब झाली आणि त्याने क्षेत्ररक्षणही केले नव्हते. भारताकडे अजून एक दिवस बाकी असून तो परतणार की संजू सॅमसनला संधी मिळणार, हे कळेलच.
या सरावामध्ये भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी फिरकीपटू वरुण चक्रवर्तीविरुद्ध चांगली फलंदाजी केली. यामध्ये तिलकने षटकारदेखील मारला. संजूनेही वेगवान गोलंदाजाविरुद्ध नेटमध्ये सराव केला. तो सुरूवातीला सांभाळून खेळताना दिसला, नंतर मात्र त्याने हार्दिक पंड्याला एक्ट्रा कव्हर आणि अर्शदीप सिंगला फ्लिक करत चांगलेच शॉट्स खेळले.
तसेच संजूने नंतर स्पिनर्स अक्षर पटेल आणि वरुणविरुद्धही सराव केला. त्याने दोघांविरुद्ध पुढे येत मोठे शॉट्स खेळले. त्याचा हा सराव पाहता भारतीय संघासाठी अभिषेक उपलब्ध नसेल तर चांगले लक्षण आहे. कारण नामिबिया पॉवरप्लेमध्ये लेफ्ट-आर्म स्पिनरचा वापर करते.
त्याचबरोबर रिंंकू सिंग, शिवम दुबे आणि हार्दिकनेही फलंदाजीचा सराव केला. सुंदरही ठीक होत असून तो नामिबियाविरुद्ध खेळणार की नाही तसेच अभिषेकही उपलब्ध असणार का, हे निर्णय संघ व्यवस्थापकांना घ्यावे लागणार आहेत. नामिबियाविरुद्धचा सामना सायंकाळी ७ वाजता असल्याने भारतीय संघाने हा सराव ६ वाजता केला. त्यामागे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची रणनीती होती.






