दुखापतीचे ग्रहण मानगुटीवर बसलेल्या भारतीय संघाला चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापुर्वी एकापाठोपाठ दोन झटके बसले आहेत. नुकत्याच सिडनी येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान अष्टपैलू रविंद्र जडेजाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्यामागोमाग कसोटी स्पेशलिस्ट हनुमा विहारी दुखापतीमुळे येत्या चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. तर जसप्रीत बुमराहदेखील दुखापतीमुळे या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. अशात कर्णधार रहाणेची ‘अजिंक्यसेना’ कशी असेल?, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
विहारी-बुमराह चौथा कसोटी सामना खेळण्याची शक्यता कमी
विहारीला सोमवारी (११ जानेवारी) सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. असे असतानाही त्याने मैदानावरच उपचार घेत फलंदाजी केली होती. त्याने आर अश्विन सोबत केलेल्या अर्धशतकी भागादीरीमुळे भारताला हा सामना अनिर्णित राखण्यात आणि मालिकेतील आव्हान कायम राखण्यात यश आले होते. तर वेगवान गोलंदाज बुमराहच्या ओटीपोटीत ताण आल्याने तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे समजत आहे.
जडेजा देखील दुखापतग्रस्त
जडेजाला देखील सिडनी कसोटी खेळतानाच दुखापत झाली. त्याला मिशेल स्टार्कने टाकलेला एक बाऊंसर चेंडू लागला. त्यामुळे त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो देखील ब्रिस्बेन येथे शेवटचा कसोटी सामना खेळणार नाही.
भारताकडे मर्यादित पर्याय शिल्लक
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने दुखापतीमुळे आतापर्यंत मोहम्मद शमी, उमेश यादव, केएल राहुल यांना गमावले आहे. तर सिडनी कसोटीत झालेल्या दुखापतीमुळे जडेजा आणि विहारी देखील कसोटी मालिकेतून बाहेर झाले आहेत. याव्यतिरिक्त रिषभ पंत आणि आर अश्विन यांनाही सिडनी कसोटीत दुखापत झाली होती. तरीही ते दोघे लढावू वृत्ती दाखवत मैदानावर उतरले होते. अशात पुढील सामन्यातील प्लेइंग इलेव्हनसाठी भारतीय संघाकडे त्याच खेळाडूंचे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यांना संघाबाहेर ठेवण्यात आले होते.
विहारीच्या जागी अगरवाल-साहाला मिळू शकते संधी
विहारीच्या जागी वृद्धिमान साहा याला यष्टीरक्षक म्हणून संघात सहभागी केले जाण्याची दाट शक्यता आहे. किंवा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवाल याला मधल्या फळीत विहारीच्या जागी संधी दिली जाऊ शकते.
जर विहारीच्या जागी साहाला अंतिम ११ जणांच्या पथकात स्थान देण्यात आले, तर यष्टीरक्षक रिषभ पंतला फलंदाजाच्या रुपात खेळवले जाऊ शकते. सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या डावात पंतने ९७ धावांची आतिशी खेळी केली होती. दरम्यान त्याने ३ खणखणीत षटकार व १२ चौकार ठोकले होते. परंतु पहिल्या डावात झालेल्या दुखापतीमुळे त्याच्याजागी साहाने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात यष्टीरक्षण केले होते. यावेळी साहाने यष्टीमागे तब्बल ४ झेल पकडले होते. त्यामुळे साहावर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवून पंतला पूर्णपणे फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जाऊ शकते.
जडेजाच्या जागी शार्दुलची निवड
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, दुखापतग्रस्त जडेजाच्या जागी शार्दुल ठाकुरला संघात सहभागी करण्यात आले आहे. कसोटी मालिकेतील आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात कर्णधार रहाणेने पाच गोलंदाजासह उतरण्याची रणनिती वापरली आहे. अशात वेगवान गोलंदाज ठाकूरला ब्रिस्बेन कसोटीतील अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळू शकते. ठाकुर गोलंदाजीसह खालच्या फळीत फलंदाजीही करु शकतो. ठाकुरऐवजी रहाणे युवा गोलंदाज टी नटराजन यालाही आजमावण्याची शक्यता आहे.
१५ जानेवारीपासून सुरु होणार ब्रिस्बेन कसोटी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चालू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तीन सामने पार पडले आहेत. आता येता चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील द गाब्बा स्टेडियमवर होणार असून या सामन्याला १५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. हा या मालिकेतील निर्णायक सामना असेल कारण सध्या मालिका तीन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी आहे.
चौथ्या कसोटी सामन्यातील भारताची संभावित प्लेइंग ११
शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिषभ पंत, मयंक अगरवाल, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का! जडेजापाठोपाठ ‘हा’ खेळाडू देखील ब्रिस्बेन कसोटीतून बाहेर
टीम इंडियाला मोठा धक्का! बॉर्डर-गावसकर मालिकेतून आणखी एक खेळाडू बाहेर