श्रीलंका विरुद्ध भारत संघात एकदिवसीय मालिका 18 जुलै पासून सुरू होणार आहेत. या मालिकेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गुरुवारी(15 जुलै) भारतीय संघाने या मालिकेपूर्वी पहिल्यांदाच दिवस-रात्र सराव केला आहे. एकदिवसीय मालिकेपूर्वी सर्व खेळाडू प्रथमच फ्लड लाइट्समध्ये खेळताना दिसून आले आहेत. या सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या वेबसाईटवर शेअर केला आहे. तसेच या व्हिडिओची छोटी झलक ट्विटवरही शेअर करण्यात आली आहे.
या व्हिडिओमध्ये सरावाबद्दल बोलताना इशान किशनने सांगितले की, खूप दिवसानंतर पहिल्यांदा फ्लड लाइट्समध्ये खेळण्यात थोडी अडचण आली, परंतु, थोड्या वेळाने सर्व खेळाडूंनी वातावरणाशी जुळवून घेतले.
त्याचबरोबर सूर्यकुमार यादवने देखील सांगितले की, खेळाडू कशा प्रकारे एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी तयारी करत आहेत. त्याने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कसे खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत, हे देखील सांगितले.
बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादवने सांगितले की, प्रशिक्षक राहुल द्रविड हे प्रत्येक खेळाडूंना वैयक्तिकरित्या समजावून सांगत असतात. ते सर्व खेळाडूंची मानसिकदृष्टीने तयारी करून घेत आहे.
सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला की, ‘आजचे सराव सत्र खूप चांगले झाले होते. प्रत्येक खेळाडूला लाईट्समध्ये सराव करायचा होता. ज्या मैदानावर आम्ही सामना खेळणार आहोत, तिथेच सराव खूप चांगला झाला. प्रत्येक खेळाडू खूप उत्साही होता. राहुल सरांचा प्रत्येक खेळाडू सोबत वेळ घालवणे आमच्या सर्वांसाठी सर्वोत्कृष्ट आहे. या संघाला ते काय देत आहे, हे सांगण्याची गरज नाही. ते प्रत्येक खेळाडूशी बोलतात, या शिबिरात बरेच खेळाडू आहेत आणि त्यांच्याशी बोलणं इतकं सोपं नाही. पण राहुल सर सर्वांना मदत करत असतात. फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा मानसिक पैलू असो राहुल सर प्रत्येक विषयावर तुम्हाला मदत करण्यासाठी आहेत. राहुल सर खूप शांत आहे आणि त्यांच्यासोबत राहायला खूप छान वाटते.’
भारताचे नियमित प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री भारतीय कसोटी संघासह इंग्लंडला गेले असल्याने श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविडकडे भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक युवा खेळाडूंना द्रविडचे मार्गदर्शन मिळणार आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये युजवेंद्र चहलने सांगितले की, राहुल द्रविड यांनी नेट सराव सुरू असताना पहिल्यांदा सर्व खेळाडूंना सांगितले की त्यांना काय करायचे आहे. त्यांनी सर्व खेळाडूंचे मनोबल वाढविले. चहलने सांगितले की, तो चांगल्या लयीमध्ये आहे आणि त्याचबरोबर त्याने नेटमध्ये चांगली गोलंदाजी करत आहे.
त्याचबरोबर भारतीय संघाचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमार म्हणाला की, खूप दिवसांपासून लाईटमध्ये सराव केला नाही, त्यामुळे असा सराव करणे गरजेचे होते. लाईटमध्ये खेळणे इतके सोपे नाही. रात्री बॉल थोडा वेगळा फिरतो, म्हणून असा सराव करणे आवश्यक होते.
Evening 🌕 ✅
Lights ON 💡💡
Intensity 💪 ⚡️We get you all the deets from #TeamIndia's first practice session under lights in Colombo 🏟️ – by @ameyatilak & @28anand
Watch the full video 🎥 👇 #SLvIND https://t.co/sNqmij1Lox pic.twitter.com/LjtPSV4RLy
— BCCI (@BCCI) July 16, 2021
युवा खेळाडूंचा संघात समावेश
सध्या भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने श्रीलंका दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, देवदत्त पडीक्कल, के गाॅथम, चेतन सकरिया, वरुण चक्रवर्ती या ६ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी असणार आहे. या संघाचे कर्णधारपद शिखर धवन सांभाळणार असून भूवनेश्वर कुमार उपकर्णधार असणार आहे.
असे आहे श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील सामन्यांचे वेळापत्रक
वनडे मालिका –
१८ जुलै – पहिला वनडे सामना, कोलंबो, (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता)
२० जुलै – दुसरा वनडे सामना, कोलंबो, (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता)
२३ जुलै – तिसरा वनडे सामना, कोलंबो, (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता)
टी२० मालिका –
२५ जुलै – पहिला टी२० सामना, कोलंबो, (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता)
२७ जुलै – दुसरा टी२० सामना, कोलंबो, (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता)
२९ जुलै – तिसरा टी२० सामना, कोलंबो, (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता)
महत्त्वाच्या बातम्या –
“धोनी नेहमीच संघात असणार नाही, कुलदीपला स्वत:चा मार्ग शोधावा लागेल”