भारताची टेनिससम्राज्ञी म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे महिला दुहेरीत अंकिता रैना हिच्यासोबत प्रतिनिधित्व करेल. सानिया विक्रमी पाचव्यांदा ऑलिम्पिकमध्ये भारताचे आव्हान सादर करणार आहे. तत्पूर्वी, तिच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. संयुक्त अरब अमिराती (युएई) या देशातर्फे दिला जाणारा गोल्डन व्हिसा मिळवणारी ती केवळ तिसरी भारतीय बनली. हा गोल्डन व्हिसा तिला १० वर्षांसाठी देण्यात आला आहे.
सानियाला मिळणार गोल्डन व्हिसा
भारताची नागरिक असलेल्या सानिया मिर्झा हिने २०१० मध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी विवाह केला होता. या दाम्पत्याचे युएई येथे घर देखील आहे. मात्र, त्यांना तेथे व्यवसाय सुरू करता येऊ शकत नव्हता. मात्र, आता गोल्डन व्हिसा मिळाल्याने ते आता तेथे व्यवसाय करण्यासाठी स्वतंत्र असतील. शोएब आणि सानिया हे दुबई येथे क्रिकेट अकादमी तसेच टेनिस अकादमी सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत.
या कारणासाठी दिला जातो गोल्डन व्हिसा
युएई सरकारने २०१९ मध्ये दीर्घकालीन निवास व्हिसासाठी एक नवीन प्रणाली लागू केली. ज्यामुळे परदेशी नागरिकांना राष्ट्रीय प्रायोजकांशिवाय युएईमध्ये राहण्यास, काम करण्यास आणि अभ्यास करण्याची परवानगी दिली जाते. हा गोल्डन व्हिसा पाच किंवा दहा वर्षांसाठी दिले जातात आणि त्याचे आपोआप नूतनीकरण केले जाते.
गोल्डन व्हिसा हा गुंतवणूकदार, उद्योजक, संशोधक, वैद्यकीय व्यावसायिक, वैज्ञानिक आणि विद्यार्थी सारख्या उत्कृष्ट कलागुण असलेल्या व्यक्तींना लोकांना दिला जातो. या नवीन नियमांतर्गत परदेशी नागरिक १००% मालकीसह युएईमध्ये व्यवसाय करण्यास सक्षम असतील.
गोल्डन व्हिसा मिळवणारी तिसरी भारतीय
सानिया मिर्झा ही युएईचा गोल्डन व्हिसा मिळवणारी तिसरी भारतीय ठरली आहे. युएईमध्ये सर्वप्रथम गोल्डन व्हिसा मिळवणारा पहिला भारतीय होण्याचा मान प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्याकडे जातो. अभिनेता संजय दत्त याला देखील नुकताच हा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. हा व्हिसा १० वर्षांसाठी असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचा युवा टेनिसपटू सुमित नागलला लागली ऑलिम्पिकची लॉटरी, पुरुष एकेरीत करणार प्रतिनिधित्व
मोठी बातमी! टेनिस स्टार रॉजर फेडररची टोकियो ऑलिम्पिकमधून माघार, ‘हे’ आहे कारण