रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघानं पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. यासह भारतानं मालिका 4-1 अशी खिशात घातली. मायदेशात भारताचा हा सलग 17वा कसोटी मालिका विजय आहे.
धरमशाला कसोटी सामना जिंकून भारतीय संघानं कसोटी क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. 1932 मध्ये पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाची कसोटी विजय आणि पराजयाची संख्या प्रथमच समान झाली आहे. धरमशाला कसोटी सामन्यापूर्वी भारताच्या पराभवाची संख्या विजयापेक्षा जास्त होती.
92 वर्षांच्या कसोटी इतिहासात, भारतानं 579 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी टीम इंडियानं 178 जिंकले तर तेवढ्याच सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. एक कसोटी बरोबरीत तर 222 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. मायदेशातील भारताचा हा 118 वा कसोटी विजय ठरला. टीम इंडियानं मायदेशात 289 कसोटी सामने खेळले आहेत. 2015 पासून भारताचं विजय-पराजय गुणोत्तर 2.545 आहे. कसोटीत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान हे फक्त चार संघ आहेत ज्यांच्या कसोटी विजयाची संख्या पराभवापेक्षा जास्त आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया सर्वात यशस्वी संघ आहे. कांगारूंनी आतापर्यंत 413 कसोटी जिंकल्या असून 232 गमावल्या आहेत. तर इंग्लंडनं 392 विजय आणि 324 पराभव, दक्षिण आफ्रिकेनं 178 विजय आणि 161 पराभव, तर पाकिस्ताननं 148 विजय आणि 142 पराभव पत्कारले आहेत.
भारतानं 1932 ते 2000 पर्यंत 336 कसोटी सामने खेळले. भारताला त्यापैकी केवळ 63 सामने जिंकता आले. तर टीम इंडियाचा 112 कसोटी सामन्यात पराभव झाला. या दरम्यान एक कसोटी बरोबरीत सुटली आणि 160 कसोटी सामने अनिर्णित राहिले.
टीम इंडियाने घरच्या मैदानावर शेवटची कसोटी मालिका 2012 मध्ये गमावली होती. तेव्हा इंग्लंडनं भारताचा पराभव केला होता. त्यानंतर कोणत्याही संघाला कसोटी मालिकेत टीम इंडियाला घरच्या मैदानावर पराभूत करता आलेलं नाही. भारतानं घरच्या मैदानावर गेल्या 51 पैकी 39 कसोटी जिंकल्या आहेत. या दरम्यान 7 कसोटी अनिर्णित राहिल्या. तर 4 कसोटीत संघाला पराभव पत्कारावा लागला. नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत पहिला सामना गमावल्यानंतर भारतानं जबरदस्त पुनरागमन करत इंग्लंडचा सलग चार सामन्यात पराभव केला. गेल्या 112 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघानं मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर उर्वरित चार सामने जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचं ‘न्यू ब्रॅन्ड ऑफ क्रिकेट’, ‘या’ 6 खेळाडूंनी काढली ‘बॅझबॉल’ची हवा!
इंग्लंडविरुद्धच्या धमाकेदार मालिका विजयानंतर WTC मध्ये भारताची स्थिती काय? पाहा पॉइंट्स टेबल
ऐतिहासिक! भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत ‘हा’ 147 वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त
,