भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी १६ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या कसोटी मालिकेसाठी काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर त्यांच्या जागी काही नवीन आणि युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, मोहम्मद शमी यांसारखे वरिष्ठ खेळाडू या मालिकेचा भाग असणार नाहीत. कर्णधार विराट कोहलीलाही पहिल्या कसोटी सामन्यात आराम देण्यात आला आहे.
कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे संघाच्या नेतृत्वा जबाबदारी सांभाळणार आहे. त्याचबरोबर पहिल्या कसोटीत चेतेश्वर पुजारा उपकर्णधार असेल. कोहली दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करेल. रवी शास्त्री आणि त्यांच्यासोबत असलेल्या सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ संपला आहे. अशा परिस्थितीत मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहुल द्रविडकडे देण्यात आली आहे.
आपण त्या ४ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना द्रविडच्या मार्गदर्शखालील भारतीय संघात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते.
१ मयंक अगरवाल
या यादीत पहिल्या क्रमांकावर भारतीय संघाचा सलामीवीर मयंक अगरवाल, जो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून शेवटचा खेळला होता. या सामन्यात त्याला मधल्या फळीत संधी देण्यात आली होती. त्यांनंतर त्याला संधी मिळालेली नाही. गेल्या तीन कसोटी मालिकेत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.
त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध राहुल द्रविड त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला कसोटी मालिकेत खेळण्याची संधी देऊ शकतो. रोहित शर्मा, विराट कोहली यांसारखे दिग्गज पहिल्या कसोटी सामन्याचा भाग नसणे हे देखील यामागे एक कारण आहे. कोहली दुसऱ्या कसोटीत संघात सामील होणार आहे. पण, त्याची जागा पहिल्या सामन्यात रिकामी होणार आहे. अशा परिस्थितीत मयंक अगरवालला सलामी किंवा मधल्या फळीत खेळताना दिसू शकतो.
२. वृद्धिमान साहा
या यादीतील दुसऱ्या क्रमांकाबद्दल भारतीय संघाचा यष्टिरक्षक आणि फलंदाज वृद्धिमान साहा, ज्याला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून खेळण्याची शेवटची संधी मिळाली होती. ऍडलेडमधील खराब प्रदर्शनानंतर साहाला एकाही सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही. संघात त्याचा समावेश केला जात असला तरी, तो फक्त बेंचवर दिसतो.
पण, रिषभ पंतची अनुपस्थिती त्याच्यासाठी मार्ग उघडू शकते. कारण केएस भरतने अजून पदार्पणही केलेले नाही. तर साहाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ३८ कसोटी सामने खेळले आहेत. त्याची सरासरी फारशी चांगली नसली तरी, त्याला कसोटी क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे राहुल द्रविडच्या कार्यकाळात त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात संधी मिळू शकते.
३. जयंत यादव
या यादीत तिसरे नाव आहे जयंत यादवचे, जे कसोटी संघासाठी धक्कादायक नाव आहे. जयंत बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघांपासून दूर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल ४ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने भारतीय संघासाठी एकूण ४ कसोटी सामने खेळले आहेत. ४ सामन्यांच्या ८ डावात गोलंदाजी करताना त्याने एकूण ११ विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटीत त्याचा गोलंदाजीचा इकॉनॉमी रेट ३.५१ खूप चांगला आहे. याशिवाय त्याने ४ सामन्यांच्या ६ डावात फलंदाजी करताना २२८ धावा केल्या आहेत. २०१७ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. यानंतर त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आले नव्हते. अशा स्थितीत राहुल द्रविड आपल्या कार्यकाळात जयंत यादवला संधी देऊ शकतो.
४. श्रेयस अय्यर
न्यूझीलंडविरुद्ध जाहीर झालेल्या १६ जणांच्या कसोटी संघात श्रेयस अय्यरची निवड धक्कादायक मानली जात होती. भारतीय संघाकडून या प्रकारासाठी पहिल्यांदाच त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. अय्यर आतापर्यंत केवळ मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळताना दिसला आहे. पण, तो न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात खेळताना दिसू शकतो. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्याचा या संघात समावेश करण्यात आला आहे.
अय्यर प्रथम श्रेणी सामन्यांत चांगली कामगिरी करत आहे. त्याने ५२.१८ च्या सरासरीने ४५९२ धावा केल्या आहेत. यात त्याने १२ शतके आणि २३ अर्धशतकांची लगावली आहेत. नाबाद २०२ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याचे देशांतर्गत प्रदर्शन पाहता राहुल द्रविड त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या या कसोटी सामन्यात पदार्पणाची संधी देऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
हसन अलीची सेमीफायनलमधील चुकीबद्दल दिलगिरी; म्हणाला, ‘माझ्यावर खूप निराश होऊ नका…’
न्यूझीलंडच्या पदरी पुन्हा निराशा; ऑस्ट्रेलियाने नेहमीच केलयं नामोहरम
वॉर्नरने अर्धशतक तर केलेच, पण ‘हा’ मोठा विक्रमही रचला; विराटचा विश्वविक्रम मात्र अबाधित