सन २००१ मध्ये सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका मुलाला प्रकल्प मिळालेला. त्याचा विषय होता, तु पुढील १५ वर्षात स्वत:ला कोठे पाहशील? त्याच्या उत्तरामुळे त्यावर्षी शाळेच्या वार्षिक पुस्तकात त्या मुलाचे नाव लिहिले गेले होते. तो मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय संघाला वनडे मालिकेत व्हाईटवॉश देणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेंबा बवुमा. वनडे मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय संघाला रिकाम्या हातांनी मायदेशी परतावे लागले आहे. यामागे दक्षिण आफ्रिका संघाचे मोठे कष्ट होतेच. मात्र, कर्णधार टेंबा बवुमाची भुमिकासुद्धा तेवढीच महत्त्वाची ठरली.
बवुमाने सहावीतील त्या प्रकल्पात आपल्या देशाच्या राष्ट्रपतींचे नाव घेत लिहले होते की, “पुढील १५ वर्षांमध्ये मी स्वत:ला राष्ट्रपती श्री. माबेकी यांच्याशी हातमिळवणी करताना पाहत असून, ते मला एक महान दक्षिण आफ्रिका संघ तयार करण्यास शुभेच्छा देत आहेत. जर मी हे करु शकलो तर माझे प्रशिक्षक, आई-वडील आणि विशेषता माझ्या दोन काकांचा आभारी राहीन.”
२०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटीत पहिले शतक झळकावेपर्यंत काही जणांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही. असे करणारा तो पहिलाच कृष्णवर्णीय दक्षिण आफ्रिकन खेळाडू बनला होता. आता तो संघाचे नेतृत्व करणारा पहिला कृष्णवर्णीय कर्णधार बनला आहे. बवुमाची वनडे कारकिर्द फक्त १६ सामन्यांची होती. त्याने ४७ कसोटी सामने खेळले आहेत. भारताविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या वनडे मालिकेत तो फक्त फलंदाजीतच नव्हे तर संपुर्ण संघाचे नेतृत्व करताना सुद्धा दिसला.
दक्षिण आफ्रिका संघाचे मिडीया व्यवस्थापक सिपोकाझी म्हणाले की, “बवुमा हा एक अप्रतिम खेळाडू आहे. तो जेवढा चांगला खेळाडू आहे तेवढाच चांगला माणूसही आहे. त्याने दक्षिण आफ्रिका संघात चांगले वातावरण निर्माण केले आहे.”
बवुमा शाळेच्या प्रकल्पामध्ये ज्या गोष्टी बोलला होता, त्या गोष्टी तो प्रत्यक्षात आणू शकतो असं कोणाला वाटले सुद्धा नसेल. परंतु, तब्बल १५ वर्षांनंतर त्याने या गोष्टीला सत्यात उतरवायला सुरूवात केली आणि त्या दिशेने वाटचाल करत आज तो काही अंतरावर आला आहे. बवुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका मालिका जिंकत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट चाहत्यांना एकच अपेक्षा आहे की, त्याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका संघाने आयसीसी ट्रॉफीचा पडलेला दुष्काळ संपवावा.
महत्त्वाच्या बातम्या-